लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अनिल देशमुखांशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणी ईडीने सादर केलेल्या आरोपपत्रात त्यांचे नावच नसल्याचे समोर आले आहे. चौकशीसाठी ईडीने बजावलेल्या समन्सविरोधात अनिल देशमुख यांची न्यायालयीन लढाई सुरू आहे. त्यामुळे त्यांची अद्याप चौकशी होऊ शकली नाही.
ईडीच्या आरोपपत्रात सचिन वाझेसह १४ जणांचा आरोपीच्या यादीत समावेश आहे. अनिल देशमुखांचे सहायक पालांडे आणि कुंदन शिंदे यांचाही समावेश आहे. मुंबईतील बार मालकांकडून वसुली प्रकरणात हे आरोपपत्र सादर करण्यात आले आहे. या प्रकरणी शेकडो कोटींचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा ईडीला संशय आहे. या प्रकरणी वारंवार समन्स बजावूनही अनिल देशमुख अद्याप चौकशीसाठी हजर झालेले नाहीत. उलट समन्स रद्द करण्यासाठी त्यांची न्यायालयीन लढाई सुरू आहे.
अनिल देशमुख यांना पाचवेळा तर त्यांचे चिरंजीव ऋषिकेश देशमुख यांना दोन वेळा ईडीकडून समन्स बजावण्यात आले. मात्र सुरुवातीला अनिल देशमुख यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांचा जबाब नोंदवण्याची मागणी ईडीकडे केली आणि त्यानंतर प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे कारण देत पाचही वेळा ते ईडीसमोर आले नाहीत.