अनिल देशमुख यांची ४ कोटी २० लाख रुपयांची मालमत्ता जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:06 AM2021-07-17T04:06:02+5:302021-07-17T04:06:02+5:30

वरळी, रायगडमधील मालमत्तेचा समावेश लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अनिल देशमुख ...

Anil Deshmukh's property worth Rs 4 crore 20 lakh confiscated | अनिल देशमुख यांची ४ कोटी २० लाख रुपयांची मालमत्ता जप्त

अनिल देशमुख यांची ४ कोटी २० लाख रुपयांची मालमत्ता जप्त

Next

वरळी, रायगडमधील मालमत्तेचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अनिल देशमुख यांची ४ कोटी २० लाख रुपयांची मालमत्ता शुक्रवारी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) जप्त केली आहे. यामुळे देशमुखांसह त्यांच्या कुटुंबीयांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

या जप्त केलेल्या मालमत्तेत मुंबईतील वरळी येथील १ कोटी ५४ लाखांचा निवासी फ्लॅट, रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील धुतूम गावातील २५ प्लॉट्सचा समावेश आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुखांवर सचिन वाझेला १०० कोटींच्या वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप केला होता. त्यानुसार गुन्हा दाखल करून ईडी तपास करत आहे. ईडीने यापूर्वी देशमुख यांची मुंबई आणि नागपुरातील घरे तसेच कार्यालये अशा वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले आहेत. त्याचबरोबर देशमुख यांचे दोन सचिव कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांना अटक केली असून, दोघेही ईडीच्या कोठडीत आहेत. तर तळोजा कारागृहात असलेल्या सचिन वाझेचाही या प्रकरणात ईडीने जबाब नोंदवला आहे.

अनिल देशमुख यांनी सचिन वाझेच्या मदतीने मुंबईतील बारचालकांकडून अवैधरित्या ४ कोटी ७० लाख रुपये वसूल केले. तसेच दिल्लीतील एका बनावट कंपनीच्या माध्यमातून अनिल देशमुख यांनी ४ कोटी १८ लाख रुपये जमवले असून, ते श्री साई शिक्षण संस्था या ट्रस्टमध्ये आल्याचे भासविल्याची माहितीही ईडीकडे असल्याचे समजते.

आरती देशमुख यांना ईडीचे पुन्हा समन्स

अनिल देशमुख यांना ईडीने तीन वेळा समन्स बजावले होते. मात्र, ते चौकशीसाठी हजर झाले नाहीत. ईडीने देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख आणि पत्नी आरती देशमुख यांनाही चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स बजावले. मात्र, तेदेखील अद्याप हजर राहिलेले नाहीत. शुक्रवारी आरती देशमुख यांना ईडीने पुन्हा समन्स बजावले आहे.

१६ वर्षांनी बनली घराची कागदपत्रे

ईडीने जप्त केलेला वरळीमधील फ्लॅट अनिल देशमुख यांच्या पत्नी आरती देशमुख यांच्या नावाने रजिस्टर आहे. २००४मध्ये या फ्लॅटची पूर्ण रक्कम रोख स्वरूपात देण्यात आली होती. मात्र, तरीदेखील त्याचे विक्रीखत थेट फेब्रुवारी २०२०मध्ये करण्यात आले. देशमुख यावेळी राज्याचे गृहमंत्री होते तसेच देशमुख आणि त्यांच्या कुटुंबीयांनी प्रीमियर पोर्ट लिंक्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची ५० टक्के मालकी अवघ्या १७.९५ लाख रुपयांना खरेदी केली. मात्र, त्याची बाजारभावानुसार किंमत जवळपास ५ कोटी ३४ लाखांच्या घरात असल्याची माहितीही ईडीकडे असल्याचे समजते.

Web Title: Anil Deshmukh's property worth Rs 4 crore 20 lakh confiscated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.