अनिल देशमुख यांच्या सचिवांसह सहाय्यकाकडे कसून चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:06 AM2021-04-12T04:06:17+5:302021-04-12T04:06:17+5:30
सीबीआयने नोंदविला जबाब; १०० कोटी वसुली टार्गेट प्रकरण लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) ...
सीबीआयने नोंदविला जबाब; १०० कोटी वसुली टार्गेट प्रकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) तपास पथकाने रविवारी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पलांडे व सहाय्यक एस कुंदन यांची कसून चौकशी केली. सुमारे चार तास त्यांचा स्वतंत्रपणे जबाब नोंदविण्यात आला असून, येत्या दोन दिवसांमध्ये अनिल देशमुख यांच्याकडे विचारणा केली जाणार असल्याचे सीबीआयच्या सूत्रांनी सांगितले.
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुख यांनी दरमहा १०० कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिल्याच्या आरोपाबाबत गेल्या सहा दिवसांपासून सीबीआय चौकशी करीत आहे. आणखी आठ दिवसांमध्ये प्राथमिक चौकशी पूर्ण करून त्यांना उच्च न्यायालयात अहवाल सादर करायचा आहे. त्यामुळे हे प्रकरण माजी गृहमंत्री देशमुख यांना अडचणीचे ठरणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
सीबीआयने रविवारी दुपारी पलांडे व कुंदन यांना अंधेरीतील विश्रामगृहात बोलावले होते. त्यानुसार साडेबाराच्या सुमारास ते हजर झाले. त्यांच्याकडे आरोपांच्या अनुषंगाने स्वतंत्रपणे सखोल विचारणा करण्यात आली. ‘लेटर बॉम्ब’च्या अनुषंगाने नेमके काय घडले होते, तुम्ही काय काय केले ? याबद्दल त्यांची माहिती घेऊन जबाब नोंदविण्यात आला. आता दस्तरखुद्द देशमुख यांचा जबाब घेतला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
या प्रकरणात आतापर्यंत मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग, मुंबई गुन्हे अन्वेषण शाखेच्या अंमलबजावणी विभागाचे उपायुक्त राजू भुजबळ आणि सहाय्यक आयुक्त संजय पाटील, तसेच एनआयएच्या अटकेतील सचिन वाझेची चौकशी करण्यत आली आहे. सर्व संबंधित साक्षीदारांचे जबाब पूर्ण झाले असून, त्यांच्या जबाबाची सुसंगती जोडली जात आहे.
.......................