मुंबई : केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) तपास पथकाने रविवारी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पलांडे व साहाय्यक एस. कुंदन यांची कसून चौकशी केली. सुमारे चार तास त्यांचा स्वतंत्रपणे जबाब नोंदविण्यात आला असून, येत्या दोन दिवसांत देशमुख यांचा जबाब नोंदवला जाण्याची शक्यता आहे.माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुख यांनी दरमहा १०० कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिल्याच्या केलेल्या आरोपाबाबत गेल्या सहा दिवसांपासून सीबीआय चौकशी करत आहे. आणखी आठ दिवसांमध्ये प्राथमिक चौकशी पूर्ण करून त्यांना उच्च न्यायालयात अहवाल सादर करायचा आहे. त्यामुळे हे प्रकरण माजी गृहमंत्री देशमुख यांना अडचणीचे ठरण्याची शक्यता आहे. या प्रकरणात आतापर्यंत मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग, मुंबई गुन्हे अन्वेषण शाखेच्या अंमलबजावणी विभागाचे उपायुक्त राजू भुजबळ आणि साहाय्यक आयुक्त संजय पाटील तसेच एनआयएच्या अटकेतील सचिन वाझेची चौकशी करण्यात आली आहे.
‘लेटर बॉम्ब’च्या अनुषंगाने तपाससीबीआयने पलांडे व कुंदन यांना अंधेरीतील विश्रामगृहात बोलावले. उभयतांकडे आरोपांच्या अनुषंगाने स्वतंत्रपणे सखोल विचारणा करण्यात आली. ‘लेटर बॉम्ब’च्या अनुषंगाने नेमके काय घडले होते, तुम्ही काय काय केले? याबद्दल त्यांची माहिती घेऊन जबाब नोंदविण्यात आला. आता दस्तुरखुद्द देशमुख यांचा जबाब घेतला जाणार आहे.