अनिल देशमुख यांची पत्नी ईडीच्या चौकशीला गैरहजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:06 AM2021-07-16T04:06:07+5:302021-07-16T04:06:07+5:30
प्रकृती अस्वस्थ असल्याचे कारण लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दाखल ...
प्रकृती अस्वस्थ असल्याचे कारण
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दाखल केलेल्या मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्याप्रकरणी त्यांच्या पत्नी आरती देशमुख चौकशीसाठी गुरुवारी गैरहजर राहिल्या. कोरोनाचा प्रादुर्भाव व प्रकृतीच्या कारणास्तव त्या कार्यालयात हजर राहू शकत नसल्याचे त्यांच्या वकिलामार्फत कळविण्यात आल्याचे समजते.
अनिल देशमुख यांना तीनवेळा तर त्याचे पुत्र ऋषिकेश यांना ईडीने एकवेळा समन्स बजावले होते. मात्र, त्यांनी चौकशीला हजर राहणे टाळले आहे. आता आरती देशमुखही गैरहजर राहिल्याने ईडी आता कोणती कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
आरती यांना गुरुवारी सकाळी अकरा वाजता बेलार्ड पियार्ड येथील कार्यालयात हजर राहण्याबाबत बुधवारी समन्स बजावले होते. मात्र, त्या ६६ वर्षांच्या असून विविध आजार आहेत, कोरोनाच्या संसर्गामुळे घराबाहेर पडणे अशक्य आहे, तसेच त्या गृहिणी असून कोणत्याही व्यवसायात सक्रिय नाहीत, असे त्यांच्या वकिलांनी कालच स्पष्ट केले होते. त्यानुसार त्या गुरुवारी ईडीच्या कार्यालयात गेल्या नाहीत. त्यांचे पती अनिल देशमुख यांनीही प्रकृतीच्या कारणास्तव प्रत्यक्ष हजर राहण्याऐवजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चौकशीची तयारी दर्शविली आहे. कठोर कारवाई टाळण्यासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलेली आहे.