आता जयसिंघानीभाेवती ईडीनेही आवळला फास; आयपीएल सट्टाप्रकरणी घेतले ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2023 05:28 AM2023-04-09T05:28:48+5:302023-04-09T05:29:41+5:30
इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलमध्ये २०१५ साली झालेल्या सट्टेबाजीच्या प्रकरणात कथित बुकी अनिल जयसिंघानी याला शुक्रवारी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केली.
मुंबई :
इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलमध्ये २०१५ साली झालेल्या सट्टेबाजीच्या प्रकरणात कथित बुकी अनिल जयसिंघानी याला शुक्रवारी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केली. आयपीएलमधील सट्टेबाजी प्रकरणी जयसिघांनी विरोधातील प्रॉडक्शन वॉरन्ट ईडीच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयात सादर केले. कोर्टाच्या मान्यतेनंतर शनिवारी ईडीने अनिल जयसिंघानीचा ताबा घेऊन पथक अहमदाबादला रवाना झाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल केल्याप्रकरणी अनिल जयसिंघानी आणि त्याची मुलगी अनिक्षा यांना अटक करण्यात आली होती. यापैकी त्याच्या मुलीला जामीन मिळाला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१५ साली झालेल्या आयपीएल सामान्यांमध्ये कोट्यवधी रुपयांची सट्टेबाजी झाल्याचे प्रकरण उजेडात आले होते. त्यात गुंतलेले बुकी प्रामुख्याने मुंबई व गुजरातेतील होते. याप्रकरणी ईडीच्या अहमदाबाद येथील कार्यालयात २०१५ सालीच मनी लाँडरिंगचा गुन्हा दाखल होता. आयपीएलमधील सट्टेबाजीचे हे प्रकरण त्यावेळी ईडीचे तेथील विभागीय संचालक जे.पी. सिंग यांनी उघडकीस आणले होते. या प्रकरणाचा सखोल तपासही त्यांनी केला होता. मात्र, त्यावेळी जे.पी. सिंग यांच्यावरच मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करण्यात आल्याचा आरोप झाला, त्यात अनिल जयसिंघानीने सक्रिय भूमिका बजावली होती. त्यानंतर जे.पी.सिंग यांना सीबीआयने अटक केली. सिंग यांच्या अटकेनंतर याप्रकरणी फारसे काही घडले नव्हते. मात्र, गेल्या ८ वर्षांपासून या प्रकरणात ईडीच्या अधिकाऱ्यांना जयसिंघानी हवा होता. तोही या प्रकरणात आरोपी आहे.
दरम्यान, २० फेब्रुवारी रोजी अनिल जयसिंघानी आणि त्याच्या मुलीने ब्लॅकमेल केल्याची तक्रार अमृता फडणवीस यांनी मुंबईच्या मलबार हिल पोलिस स्टेशनमध्ये दाखल केली होती. त्यानंतर अनिल व त्याची मुलगी अनिष्का या दोघांना मुंबई पोलिसांनी अटक केली. प्रतिबंधित वस्तूंची विक्री केल्याप्रकरणी देखील अलीकडेच अनिल जयसिंघानी याला मध्य प्रदेश पोलिसांनी देखील अटक केली होती.