Join us  

अनिल जयसिंघानीची मालमत्ता १०० कोटींची, आयपीएल बेटिंग; मुंबई, उल्हासनगरमध्ये ईडीचे छापे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2023 7:08 AM

ईडीचे अधिकारी जयसिंघानी याच्या मालमत्तेची चौकशी करत आहेत.

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांना ब्लॅकमेल केल्याप्रकरणी अटकेत असलेला बुकी अनिल जयसिंघानी याच्या उल्हासनगर येथील घरी व मुंबईतील संबंधित काही ठिकाणी ईडीने मंगळवारी छापेमारी केली. ईडीचे अधिकारी जयसिंघानी याच्या मालमत्तेची चौकशी करत आहेत. आतापर्यंत केलेल्या तपासाद्वारे त्याची मालमत्ता १०० कोटी रुपयांची असल्याचे निष्पन्न झाले आहे. यामध्ये हॉटेल्स, फ्लॅटस्, दुकाने, भूखंड आणि अन्य काही स्थावर मालमत्तांचा समावेश असल्याचे समजते.

२०१५ साली झालेल्या आयपीएल व अन्य सामन्यांत त्याने सट्टेबाजी केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. ईडीच्या अहमदाबाद येथील पथकाने मुंबईत छापेमारी केली. या प्रकरणी गुजरात व दिल्ली येथून ईडीच्या अधिकाऱ्यांनी आतापर्यंत एकूण १६ जणांना अटक केली आहे. उपलब्ध माहितीनुसार २०१५ च्या प्रकरणानंतर ईडीचे अधिकारी जयसिंघानी याचा शोध घेत होते. मार्च महिन्यांत अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल केल्याप्रकरणी त्याला मुंबई पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर ईडीचे अधिकारीदेखील आता सट्टेबाजी प्रकरणी तपास करत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१५ साली झालेल्या आयपीएल सामन्यांमध्ये २ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त सट्टेबाजी झाल्याचे प्रकरण उजेडात आले होते. या सट्टेबाजीत गुंतलेले बुकी हे प्रामुख्याने मुंबई व गुजरातमधील होते. या प्रकरणी ईडीच्या अहमदाबाद येथील कार्यालयामध्ये २०१५ सालीच मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल झाला होता.

अन्य राज्यांतही गुन्हे दाखल

प्रतिबंधित वस्तूंची विक्री केल्याप्रकरणी देखील अलीकडेच जयसिंघानी याला मध्य प्रदेश पोलिसांनीदेखील अटक केली होती, तर त्याच्या विरोधात अन्य राज्यांतदेखील काही गुन्ह्यांची नोंद झालेली आहे.

टॅग्स :मुंबईपोलिस