अनिल जयसिंघानीच्या अडचणी वाढणार! १५०० कोटींच्या मॅच फिक्सींगच रॅकेट उघडं, क्रिकेटपटू, पोलिसांचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2023 02:05 PM2023-03-29T14:05:52+5:302023-03-29T14:12:41+5:30
अनिल जयसिंघानीच्या अडचणीत आणखी वाढ होणार आहे.
बुकी अनिल जयसिंघानीया याला मुंबईच्या गुन्हे शाखेने गुजरातमधून २० मार्च रोजी अटक केली. न्यायालयाने जयसिंघानीला १४ दिवसांची पोलीस कोठडी दिली. दरम्यान, आता चौकशीत आणखी एक मोठा खुलासा झाला आहे. यामुळे आता अनिल जयसिंघानीच्या अडचणीत आणखी वाढ होणार आहे. १५०० कोटींचं मॅच फिक्सींगचं रॅकेट उघडं झालं आहे. या प्रकरणी अनिल जयसिंघानी आणि फरार असलेला बुकी रमेश यांच्यातील फोनवरील संभाषण समोर आलं आहे. यात क्रिकेटपटू आणि पोलिसांचाही समावेश असल्याचं समोर आलं आहे.
या ऑडिओ क्लिपमधून अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. यात अनिल जयसिंघानी रमेश नावाच्या एका बुकीसोबत असल्याचे दिसत आहे'रमेश भाई मी सनी बोलत आहे, आपले अगोदर बोलण झालं होते. तुम्हाला मुंबईत जागा हवी आहे का? माझं स्वत:च ठाण्यात आणि शिर्डीमध्ये हॉटेल आहे, एकदम सुरक्षीत आहे. तुम्हाला दोन पोलिसांचे संरक्षणही देतो', असं अनिल जयसिंघानी बोलत असल्याचे संभाषण समोर आले आहे. यामुळे आता या रॅकेटमध्ये पोलिसांचाही समावेश असल्याचे उघडकीस झाले आहे.
अमृता फडणवीस धमकी प्रकरणी मोठी अपडेट! आरोपी अनिक्षा जयसिंघानीला जामीन मंजूर
पोलीस या प्रकरणी अधिक चौकशी करत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून अनिल जयसिंघानी फरार होता. अमृता फडणवीस यांना लाच देण्याच्या प्रकरणी अनिक्षा जयसिंघानीला ताब्यात घेतल्यानंतर या प्रकरणी तपास सुरू झाला. काही दिवसातच पोलिसांनी अनिल जयसिंघानीला गुजरातमधून ताब्यात घेतले. आता या प्रकरणी आणखी नवीन खुलासे होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अमृता फडणवीसांना दिली होती धमकी
महाराष्ट्रासह गोवा, आसाममध्ये सरकारी अधिकाऱ्यांना धमकावणे, फसवणूक करण्यासह विविध गुन्हे दाखल असलेला कुख्यात फरार बुकी व उल्हासनगरचा माजी नगरसेवक अनिल जयसिंघानीवरील पोलिस कारवाई टाळण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना १ कोटीच्या लाचेची ऑफर दिली होती.