Join us

अनिलकुमार लाहोटी मध्य रेल्वेचे नवीन महाव्यवस्थापक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2021 4:06 AM

मुंबई : मध्य रेल्वेचे नवीन महाव्यवस्थापक म्हणून अनिलकुमार लाहोटी यांनी शुक्रवारी पदभार स्वीकारला. महाव्यवस्थापक म्हणून रुजू होण्यापूर्वी ते उत्तर ...

मुंबई : मध्य रेल्वेचे नवीन महाव्यवस्थापक म्हणून अनिलकुमार लाहोटी यांनी शुक्रवारी पदभार स्वीकारला. महाव्यवस्थापक म्हणून रुजू होण्यापूर्वी ते उत्तर रेल्वेचे मुख्य प्रशासकीय अधिकारी (निर्माण) होते. लाहोटी हे इंडियन रेल्वे सर्व्हिस ऑफ इंजिनिअर्सच्या १९८४ च्या बॅचचे अधिकारी असून, आयआयटी रुरकीमधून त्यांनी मास्टर ऑफ इंजिनिअरिंग (स्ट्रक्चर्स) ही पदवी घेतली आहे.

लाहोटी यांनी मध्य रेल्वेमध्ये नागपूर, जबलपूर, भुसावळ विभाग आणि मध्य रेल्वे मुख्यालय येथे १९८८ ते २००१ पर्यंत विविध पदांवर काम केले. रेल्वे बोर्डाचे इंजिनिअरिंग सदस्य यांचे विशेष कार्य अधिकारी, रेल्वे बोर्ड आणि उत्तर मध्य रेल्वेचे प्रधान मुख्य अभियंता म्हणूनही त्यांनी काम केले आहे.

नवी दिल्ली स्टेशनला जागतिक दर्जाचे स्टेशन बनविण्यासाठी झालेल्या विकासकामांत त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. त्याशिवाय, मुख्य प्रशासकीय अधिकारी (निर्माण), मुख्य अभियंता (निर्माण) पदांवर कार्यरत असताना त्यांनी नवीन पायाभूत सुविधा, दुहेरीकरण, यार्ड रिमॉडेलिंग आणि महत्त्वाचे पूल यांचे पायाभूत प्रकल्प राबविले. ट्रॅक मेंटेनन्स निकष समितीचे सदस्य म्हणून ट्रॅक देखभाल व्यवस्था कार्यक्षम आणि प्रभावी बनविण्यासाठी वस्तुनिष्ठ धोरण विकसित करण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. भारतीय रेल्वेवर ट्रॅक देखभालीच्या संपूर्ण यांत्रिकीकरणासाठी सर्वसमावेशक मास्टर प्लॅन तयार करण्यात लाहोटी यांनी पुढाकार घेतला. लाहोटी यांनी स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट इंडियन स्कूल ऑफ बिझनेस, हैदराबाद; बोकोनी स्कूल ऑफ मॅनेजमेंट, मिलान, इटली येथे एक्झिक्युटिव्ह लीडरशिप प्रोग्राम; कार्नेगी मेलॉन युनिव्हर्सिटी, अमेरिका येथे अ‍ॅडव्हान्स लीडरशिप आणि स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट प्रोग्राम आणि अमेरिका येथेच कॉन्टॅक्टलेस ट्रॅक रेकॉर्डिंगचे प्रशिक्षण घेतले आहे.