मुंबई : शंभर ते दोनशे जणांच्या वाद्यवृंदाच्या संचाकडून त्यांना हवे असलेले ‘एक सूर एक ताला’मध्ये संगीताचे संयोजन करण्यामध्ये ज्यांचा हातखंडा होता व संगीत अनिलचे आहे म्हटल्यानंतर संगीतप्रेमींनासुद्धा कार्यक्रम चांगला होणारच, असा ठाम विश्वास होता; ते दिग्गज व्यक्तिमत्त्व म्हणजे संगीतकार अनिल मोहिले. त्यांचे नाव मनोरंजन मैदानाला दिल्याबद्दल मुंबईकरांना सार्थ अभिमान वाटतो, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.महापालिकेतर्फे बांधलेल्या ‘संगीतकार अनिल मोहिले मनोरंजन मैदाना’चे लोकार्पण उद्धव ठाकरे यांच्या हस्ते चार बंगला, अंधेरी पश्चिम येथे पार पडले. या वेळी ते बोलत होते. आज आपण ज्या मनोरंजन मैदानाचे लोकार्पण केले, ते अप्रतिमपणे तयार करण्यात आले असून, या मैदानात फेरफटका मारणे संगीतप्रेमींसाठी मेजवानी ठरणार आहे, असेही ते म्हणाले.अतिरिक्त महापालिका आयुक्त संजय देशमुख या वेळी म्हणाले की, मॉडेल टाउन परिसरात सुमारे ९ हजार ४०० चौरस मीटर क्षेत्रावर साकारलेल्या या मनोरंजन मैदानाचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे ‘सतार ते गिटार’ या नावीन्यपूर्ण संकल्पनेवर आधारित मैदानाची निर्मिती केली आहे. विविध वाद्यांच्या प्रतिकृतींची आकर्षक मांडणी केली आहे. मैदानासाठी सुमारे १३ कोटी २३ लाख ७५ हजार रुपये खर्च आला.सुशोभित प्रवेशद्वार, पदपथ व जाळी, पुष्पवाटिका, पुष्पकुंज, पुष्पलता मंडप, पदपथावरही संगीत ऐकण्यासाठी ध्वनिक्षेपण व्यवस्था, ज्येष्ठ नागरिकांसाठी योगा केंद्र, स्केटिंग, व्हॉलिबॉल मैदान, संगीत कारंजी, मुलांसाठी खेळ, खुली व्यायामशाळा, एलईडी दिवे, हिरवळ, विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड, आसनव्यवस्था, अंतर्गत बाकांची रचना या सुविधांचा यात समावेश आहे. (प्रतिनिधी)
अनिल मोहिलेंचे मैदानाला नाव ही अभिमानाची बाब
By admin | Published: December 25, 2016 4:19 AM