अनिल परब पुन्हा विधान परिषदेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 02:08 AM2018-07-02T02:08:06+5:302018-07-02T02:08:21+5:30
शिवसेनेतर्फे आमदार अनिल परब यांना पुन्हा एकदा विधान परिषदेवर संधी दिली जाणार आहे. मातोश्री येथे रविवारी शिवसेना नेत्यांच्या बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
- मनोहर कुंभेजकर
मुंबई : शिवसेनेतर्फे आमदार अनिल परब यांना पुन्हा एकदा विधान परिषदेवर संधी दिली जाणार आहे. मातोश्री येथे रविवारी शिवसेना नेत्यांच्या बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १६ जुलैला मतदान होणार आहे.
विधान परिषदेतील राष्ट्रवादीचे चार, काँग्रेसचे तीन, भाजपाचे दोन आणि शेकापचे एक सदस्य निवृत्त होत आहेत. या रिक्त जागांसाठी १६ जुलैला मतदान होणार आहे. विधानसभेतील सध्याच्या पक्षीय संख्याबळानुसार भाजपाच्या वाट्याला पाच, शिवसेनेकडे दोन आणि आघाडी झाल्यास काँग्रेस-राष्ट्रवादीच्या वाट्याला तीन जागा येऊ शकतात. अकराव्या जागेसाठी मात्र जुळवाजुळव करावी लागणार आहे.
शिवसेनेकडे अतिरिक्त मते असल्याने तिसरा उमेदवार देत अकरावी जागा खेचून आणण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. अनिल परब हे उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी मानले जातात.
मनसेच्या सहा नगरसेवकांना शिवसेनेत आणणे, मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक आणि नुकत्याच झालेल्या मुंबई पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत त्यांनी मोलाची भूमिका बजावली होती. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा विधान परिषदेवर संधी मिळाली.
दुसऱ्या आणि तिसºया जागेसाठी अन्य नावांचा विचार यावेळी झाला. शिवसेनेचे सचिव आणि उद्धव ठाकरे यांचे स्वीय्य सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांच्या नावावरही चर्चा झाली.