मुंबई :
गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांकडून अवैधपणे पैसे जमा केले आहेत. हा निधी कुठे गेला, कोणत्या कामासाठी वापरला गेला, तसेच शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्यासाठी हा पैसा वापरला का याचा तपास करणार असल्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सोमवारी सांगितले. तसेच पवारांच्या घरावरील हल्ल्यासाठी सदावर्तेच जबाबदार असल्याचा आरोपही परब यांनी केला.
न्यायालयाने २२ एप्रिलपर्यंत कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे निर्देश दिले होते. कोविड आणि संप दोन्ही संपले आहेत. आता एसटी सेवा पूर्ववत सुरू करण्यासाठी मंत्री अनिल परब यांनी सोमवारी मंत्रालयात अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर परब म्हणाले की, कोविडमुळे आधीच एसटीची चाके थांबली होती. त्यात कामगारांच्या संपामुळे राज्यभरात एसटी पूर्णपणे बंद झाली. मात्र, सर्वसामान्यांची एसटी लवकरच पूर्ववत होईल. संपकरी कामगार कामावर हजर झाल्यानंतर एसटी लोकांच्या सेवेला जाण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील, असे अनिल परब यांनी सांगितले. तसेच गेल्या दोन वर्षांमध्ये एसटीचे मार्ग विस्कळीत झाले असल्याने काही मार्गही ठरवावे लागणार आहेत, असे परब म्हणाले.