Anil Parab: "ही तर कर्माची फळं", परब यांच्यावरील कारवाईनंतर लाडू खाऊन सदावर्तेंनी केला जल्लोष
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2022 01:07 PM2022-05-26T13:07:17+5:302022-05-26T14:20:24+5:30
या कारवाईनंतर भाजपने शिवसेना आणि सत्ताधिकाऱ्यांना लक्ष्य केलंय. तर, अॅड. गुणरत्न सदावर्तेंनी हाहाहाहाहाहा.. अशी आनंद झाल्याची पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई - शिवसेना नेते आणि मंत्री अनिल परब यांच्यावर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून गुन्हा दाखल झाला आहे. त्याचसोबत शासकीय निवासस्थानासह ७ ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. अनिल परब यांचे निकटवर्तीय असलेले ईडीच्या जाळ्यात अडकले आहेत. मुंबई, पुणे, रत्नागिरी याठिकाणी ईडीने छापेमारी केली आहे. त्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. या कारवाईनंतर भाजपने शिवसेना आणि सत्ताधिकाऱ्यांना लक्ष्य केलंय. तर, अॅड. गुणरत्न सदावर्तेंनी हाहाहाहाहाहा.. अशी आनंद झाल्याची पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
ढवळ्या शेजारी पवळ्या गेला, वान नाही पण गुण लागला. लवासा, सिंचन, आदर्श हे सगळ्या गोष्टीचा पिठारा ज्यांच्याकडे आहे, त्यांच्या नादाला लागल्यानंतर काही गुण अंगात संचारणार यात दुमत नाही. त्याचेच प्रारुन म्हणजे मनी लाँड्रींगच्या गुन्ह्याची उकल होत राहणार, असे गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले. यावेळी, त्यांच्यासमेवत काही एसटी कामगार हेही उपस्थित होते.
एसटी कामगारांची तळतळ, हळहळ याचेच हे परिणाम असून जैसी करणी वैसी भरणी, ही कर्माची फळं आहेत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका सर्वसामान्य कष्टकरी माणसाला त्या पदावर बसवायला हवं होतं, असे म्हणत अॅड. गुणरत्न सदावर्तेंनी अनिल परब यांच्यावरील कारवाईचे समर्थन केले. तसेच, लाडू वाटून आनंद व्यक्त केला, जे होतंय त्या गोष्टीचं हे समर्थन असल्याचे सांगत एसटी कर्मचाऱ्यांसह लाडू खाऊन त्यांनी जल्लोष व्यक्त केलं.
जयश्री पाटील ईडी कार्यालयात जाणार
जयश्री पाटील या एका बँकेच्या घोटाळ्यासंदर्भात ईडी कार्यालयात आज मोठी तक्रार घेऊन जाणार आहेत. त्यातून, महाराष्ट्राला आणि देशाला समजून येईल की, सत्तेचा कसा दुरुपयोग करण्यात आला. लोकांनाच माहिती नाही, त्यांच्या खात्यावर पैसे कसे आले. यासंदर्भात आज मोठी तक्रार दाखल होईल, असा इशाराही गुणरत्न सदावर्ते यांनी दिला.
किरीट सोमय्यांनीही साधला निशाणा
अनिल परब यांच्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी निशाणा साधला आहे. राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख, नवाब मलिक तुरुंगात आहेत, आता अनिल परब यांनीही तयार राहावे. तसेच अनिल परब यांनी आता आपला बोजा-बिस्तरा भरावा, असा खोचक सल्ला देखील किरीट सोमय्यांनी दिला आहे.
7 ठिकाणी धाडी
परिवहन मंत्री अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानी ईडीचे अधिकारी पोहचले आहेत. सीआरपीएफ जवानाच्या तुकड्याही त्यांच्यासोबत आहेत. वांद्रे येथील खासगी घरातही ईडीच्या अधिकाऱ्यांचे सर्च ऑपरेशन सुरू आहे. परब यांच्या संबंधित ७ ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या आहेत. अनिल देशमुख प्रकरणाचे तपास अधिकारी शिवालय बंगल्यात पोहचले आहेत. ईडीच्या अधिकाऱ्यांकडून अनिल परब यांची चौकशी करण्यात येऊ शकते.
दरम्यान, पर्यावरण मंत्रालय भारत सरकार यांनी ३१ जानेवारी २०२२ रोजी दापोली रत्नागिरी येथील साई रिसॉर्ट एन एक्स व सी कोच हे अनधिकृत असून तोडण्याचे आदेश दिले होते. ९० दिवसांमध्ये रिसॉर्ट मालक किंवा प्रशासनाने हे दोन्ही रिसॉर्ट तोडायचे होते. मात्र, ९० दिवस पूर्ण झाले असून अजूनही रिसॉर्ट पाडण्यात आले नाही.