विधान केले परबांनी, दिलगिरी व्यक्त केली दानवेंनी; सत्ताधारी आक्रमक, विधान परिषद तीनदा तहकूब
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 05:29 IST2025-03-08T05:28:10+5:302025-03-08T05:29:13+5:30
अनिल परब यांनी आक्षेपार्ह विधानाबद्दल माफी मागावी, अशी मागणी करत सत्ताधारी आमदारांनी विधान परिषदेचे कामकाज तीन वेळा रोखून धरले.

विधान केले परबांनी, दिलगिरी व्यक्त केली दानवेंनी; सत्ताधारी आक्रमक, विधान परिषद तीनदा तहकूब
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: उद्धवसेनेचे आ. अनिल परब यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाबद्दल त्यांनी माफी मागावी अशी मागणी करत सत्ताधारी आमदारांनी विधान परिषदेचे कामकाज तीन वेळा रोखून धरले. अखेर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिलगिरी व्यक्त केल्यावर पुढील कामकाज सुरळीत सुरू झाले.
राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान गुरुवारी आ. परब यांनी संभाजीराजे यांचा धर्म बदलण्यासाठी छळ झाला. त्याचप्रमाणे पक्ष बदलण्यासाठी माझाही छळ झाला. ईडी, सीबीआयच्या नोटीस आल्या पण पक्ष बदलला नाही, असे विधान केले होते. शुक्रवारी नियमित कामकाज सुरू होताच भाजप गटनेते प्रवीण दरेकर यांनी हा मुद्दा उपस्थित करत परब यांनी माफी मागावी अशी मागणी केली.
मंत्री शंभूराज देसाई यांनी परब यांनी स्वतःची बरोबरी संभाजी महाराज यांच्याबरोबर करणे हे चुकीचे आहे. त्यांनी संभाजी महाराज यांच्या समाधी स्थळाजवळ नतमस्तक होऊन बिनशर्त माफी मागावी, अशी मागणी केली. मंत्री नितेश राणे यांनीही माफीनामा झाला पाहिजे असे सांगितले.