Join us

Anil Parab: महाराष्ट्रातील राजकारणाला इतकं वाईट वळण कधी आलं नाही; संजय राऊत संतापले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2022 10:25 AM

शिवसेनेचे सर्व नेते आणि राज्य सरकार अनिल परब यांच्या पाठिशी आहे. सरकारला त्रास देण्यासाठीच राजकीय दृष्टीने कारवाई केली जातेय असा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला.

मुंबई – अनिल परब(Anil Parab) हे आमचे सहकारी आहे. कट्टर शिवसैनिक आहेत. शिवसेना नेत्यांवर राजकीय हेतूने कारवाई करण्यात येत आहे. परंतु आम्ही सगळे पक्ष आणि सरकार म्हणून अनिल परब यांच्या पाठिशी ठाम आहोत अशा शब्दात शिवसेना नेते संजय राऊत यांनी अनिल परब यांच्यावरील ईडी कारवाईवर प्रतिक्रिया दिली आहे. सकाळी अनिल परब संबंधित राज्यातील ७ ठिकाणी ईडीने छापेमारी केली आहे. त्यानंतर राज्यात खळबळ माजली आहे.

याबाबत शिवसेना नेते संजय राऊत(Shivsena Sanjay Raut) म्हणाले की, ज्याप्रकारे अनिल परब यांच्यावर कारवाई होतेय त्याहून गंभीर गुन्हे भाजपा नेत्यांवर आहेत. मात्र त्यांच्यावर कारवाई होत नाही. सूडाच्या भावनेने कितीही कारवाया केल्या तरी आम्ही गप्प बसणार नाही. सरकार सुरळीत चालेल. महाराष्ट्राच्या राजकारणाला इतके वाईट वळण गेल्या ५५ वर्षात मिळालं नव्हतं. शिवसेनेचं मनोबल आणि मविआ सरकारचं मनोबल खच्चीकरण होत नाही. भाजपा नेत्यांविरोधात आमच्याकडे सक्षम पुरावे आहेत. नवलानीला कुणी पळवले त्याचे उत्तर द्यावे असं त्यांनी सांगितले.

तसेच शिवसेनेचे सर्व नेते आणि राज्य सरकार अनिल परब यांच्या पाठिशी आहे. सरकारला त्रास देण्यासाठीच राजकीय दृष्टीने कारवाई केली जातेय. फक्त शिवसेनेला बदनाम करायचं. महाविकास आघाडी सरकारवर दबाव टाकण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणाचा गैरवापर केला जात आहे. विक्रांत घोटाळा प्रकरणी दिलासा मिळतो. माझ्यावर मानहानीचा दावा दाखल केला म्हणून मी मागे हटणार नाही. आम्ही पुरावे दिले परंतु फाइल उघडण्याची तसदी तपास यंत्रणा घेत नाहीत असा आरोप संजय राऊत यांनी भाजपावर केला आहे.

काय आहे प्रकरण?

परिवहन मंत्री अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानी ईडीचे अधिकारी पोहचले आहेत. सीआरपीएफ जवानाच्या तुकड्याही त्यांच्यासोबत आहेत. वांद्रे येथील खासगी घरातही ईडीच्या अधिकाऱ्यांचे सर्च ऑपरेशन सुरू आहे. परब यांच्या संबंधित ७ ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या आहेत. अनिल देशमुख प्रकरणाचे तपास अधिकारी शिवालय बंगल्यात पोहचले आहेत. ईडीच्या अधिकाऱ्यांकडून अनिल परब यांची चौकशी करण्यात येऊ शकते.

या प्रकरणी भाजपाने सरकारवर हल्लाबोल केला आहे. अनिल परबांनी शेकडो कोटींचा घोटाळा केला आहे. २५ कोटी रिसोर्ट बांधले. त्या बांधकामाचा खर्च कोणी केला? सचिन वाझेकडून १०० कोटी वसुली येत होती त्यातही अनिल परब यांचे नाव होते. उद्धव ठाकरे यांनी अनिल परब यांनी माझी हत्या करण्याचा प्रयत्न झाला. माझ्या नावानं बोगस एफआयआर करण्यात आला. पोलिसांना कुणाचा फोन येत होता? अनिल परबांनी बॅग भरायला घ्यावी. अनिल परब हे उद्धव ठाकरेंचे राइट हँण्ड आहे असा आरोप किरीट सोमय्यांनी(BJP Kirit Somaiya) केला आहे.

टॅग्स :अनिल परबशिवसेनासंजय राऊत