मुंबई-
राज्यात गेल्या 14 दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारमध्ये विलिनीकरणाच्या मागणीसाठी राज्यभरातील एसटी बस सेवा बंद ठेवली आहे. यावरुन राजकारण देखील चांगलंच तापलेलं पाहायला मिळत आहे. आमदार नितेश राणे देखील एसटी कर्मचाऱ्यांसोबत आज आंदोलनात उतरले आणि राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. राज्य सरकार जर ऐकलं नाही, तर एकाही मंत्र्याला राज्यात फिरू देणार नाही, असा थेट इशाराच नितेश राणे यांनी सरकारला दिला. तसंच एसटी कर्मचाऱ्यांसाठी एका दिवसाचं विशेष अधिवेशन घेण्याचीही मागणी त्यांनी केली आहे. यातही त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोमणा मारला. मुख्यमंत्र्यांच्या सोयीसाठी हवतर मुंबईतच अधिवेशन बोलवा, नागपूरलाही नको, असं नितेश राणे म्हणाले.
नितेश राणे यांच्या टीकेवर आता राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी जशास तसं प्रत्युत्तर दिलं आहे. "कोण नितेश राणे? आम्ही त्यांना ओळखत नाही. नितेश राणेंचं आरोप आम्ही मोजतच नाही. कारण मुख्यमंत्र्यांवर आरोप करण्याची त्यांची पात्रताच नाही. त्यामुळे त्यांनी काय म्हटलं याला आम्ही किंमतच देत नाही", असं म्हणत अनिल परब यांनी नितेश राणेंना सणसणीत टोला हाणला आहे.
एसटी कर्मचाऱ्यांना कामावर परतण्याचं आवाहन देखील अनिल परब यांनी पुन्हा एकदा केलं. "आम्ही तुमच्या विरोधात नाही. तुमचे प्रश्न सुटावेत हाच आमचा प्रश्न आहे. त्यामुळे तुम्ही कामावर या. राजकारण्यांच्या नादी लागून स्वत:चं नुकसान करून घेऊ नका, असं आवाहन करतानाच एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न उच्च न्यायालयातूनच सोडवला जाईल", असं अनिल परब यांनी सांगितलं.