Anil Parab vs Kirit Somaiya, Lok Sabha Election 2024: २०१९मध्ये महाविकास आघाडी स्थापन झाल्यापासून भाजपाने आक्रमकपणे तेव्हाच्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका केली. भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मुंबई महापालिका आणि इतर भ्रष्टाचाराच्या फाईल्स ईडी सीबीआयकडे सुपूर्द करत तत्कालीन शिवसेनेच्या अनेक नेतेमंडळींवर आरोप केले होते. या नेत्यांमध्ये यशवंत जाधव, रवींद्र वायकर, राहुल शेवाळे आदींचा समावेश होता. लोकसभेच्या २०२४ निवडणुकीसाठी मुंबईतील तीन मतदारसंघात आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून यशवंत जाधवांच्या पत्नी यामिनी जाधव, रवींद्र वायकर आणि राहुल शेवाळे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. याच पार्श्वभूमीवर या तीन उमेदवारांसाठी किरीट सोमय्यांना स्टार प्रचारक करावे, अशी खोचक मागणी उद्धव ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी केली आहे. (Yamini Yashwant Jadhav, Ravindra Waikar, Rahul Shewale)
"किरीट सोमय्या यांच्या म्हणण्याप्रमाणे रवींद्र वायकर हे भ्रष्टाचारी होते, पण शिंदेंच्या शिवसेनेचे त्यांनी पक्षात घेतले. यशवंत जाधव जशी चौकशी सुरु झाली तेव्हा शिंदे गटात पळाले. या एवढ्या मोठ्या प्रमाणात भ्रष्ट्राचाराचे आरोप केलल्या लोकांना मंगळवारी लोकसभेची उमेदवारी दिली. यावरून असा प्रश्न पडतो की, महायुतीतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपाला या भ्रष्ट्राचार मान्य होता का? राहुल शेवाळे, यामिनी जाधव, वायकर या सर्वांचे प्रचारप्रमुख म्हणून किरीट सोमय्या यांची नियुक्ती केली जाणार का? माझी अशी विनंती आहे की त्यांनाच यांचे स्टार प्रचारक करावे. कारण त्यांच्यामुळेच तुम्हाला हे उमेदवार मिळाले आहेत. लाखमोलाचे जे उमेदवार महायुतीला मिळाले आहेत, त्याचे श्रेय किरीट सोमय्या यांनाच जाते. मग किरीट सोमय्या यांनाच या उमेदवारांचा प्रचार करायला लावावा. सोमय्या यांनी हे उमेदवार कसे स्वच्छ आहेत, हे महाराष्ट्राला समजावून सांगावं अशी माझी भाजपा विनंती आहे," असे खोचक टोला लगावत परब यांनी महायुतीवर तोंडसुख घेतले.
दरम्यान, मुंबईतील एकूण सहा मतदारसंघापैकी तीन जागा भाजपाच्या वाट्याला आल्या असून उर्वरित तीन जागांवर शिंदे सेनेचे उमेदवार जाहीर झाले आहे. त्यात राहुल शेवाळे यांना मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघ, यामिनी जाधव यांना दक्षिण मुंबई मतदारसंघ आणि रवींद्र वायकर यांना उत्तर पश्चिम मुंबईतून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर भाजपाकडून पीयूष गोयल, मिहीर कोटेचा आणि उज्ज्वल निकम उर्वरित तीन मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.