अनिल परब आज उमेदवारी अर्ज दाखल करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2024 06:00 AM2024-06-03T06:00:36+5:302024-06-03T06:59:26+5:30
मुंबई आणि कोकण पदवीधर तसेच नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा विधानपरिषदेच्या चार जागांसाठी २६ जून रोजी मतदान होणार आहे.
मुंबई : विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदारसंघातून उद्धवसेनेचे नेते आणि माजी मंत्री आमदार अनिल परब हे सोमवारी ३ जून रोजी उमेदवारी अर्ज भरणार आहेत. यावेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह उद्धवसेनेचे लोकसभा उमेदवार अरविंद सावंत, अनिल देसाई, अमोल कीर्तिकर, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा प्रा. वर्षा गायकवाड, काँग्रेस लोकसभा उमेदवार भूषण पाटील तसेच महाविकास आघाडीचे प्रमुख नेते, आमदार, खासदार उपस्थित राहणार आहेत.
मुंबई आणि कोकण पदवीधर तसेच नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा विधानपरिषदेच्या चार जागांसाठी २६ जून रोजी मतदान होणार आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघातून उद्धव ठाकरे यांनी मागील आठवड्यातच अनिल परब यांची उमेदवारी जाहीर केली होती. दुसरीकडे या मतदारसंघासाठी महायुतीचा उमेदवार अजूनही घोषित झालेला नाही. २००४, २०१२ आणि २०१८ असे तीन वेळा अनिल परब हे विधानपरिषदेचे आमदार राहिलेले आहेत. मात्र प्रथमच ते मुंबई पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.