अनिल परबांचा डाव ओळखावा; मनसेच्या आरोपामुळे अंधेरी पोटनिवडणुकीत वेगळाच ट्विस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2022 10:48 AM2022-10-13T10:48:38+5:302022-10-13T10:49:43+5:30
ऋतुजा लटके या बाळासाहेबांची शिवसेना असलेल्या शिंदे गटात जाण्याची चर्चा सुरू झाल्यानंतर ठाकरे गटाने सावध पावलं उचलत प्लॅन बी तयार ठेवला आहे.
मुंबई - अंधेरी पोटनिवडणुकीबाबत अद्यापही सत्ताधारी भाजपा-बाळासाहेबांची शिवसेना आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून कुणालाच उमेदवारी जाहीर नाही. दिवंगत रमेश लटकेंच्या पत्नी ऋतुजा लटके यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळणार होती. परंतु ऋतुजा लटकेंचा राजीनामा अद्यापही मुंबई महापालिका प्रशासनाने मंजूर केला नाही. याबाबतचा निर्णय आता हायकोर्टात होणार आहे. मात्र तत्पूर्वी मनसेचे कामगार सेना अध्यक्ष मनोज चव्हाण यांनी अनिल परबांवर आरोप करत वेगळाच ट्विस्ट केला आहे.
मनोज चव्हाण यांनी ट्विट करत म्हटलंय की, मुळात ऋतुजा लटकेताईंना राजीनाम्याच्या जंजाळात अडकावून अंधेरी विधानसभेची उमेदवारी माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना देण्याचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अनिल परब यांचा डाव आहे. लटके वहिनींनी हा डाव ओळखावा इतकेच या आशयाचे त्यांनी ट्विट करत अनिल परबांवर आरोप केला आहे.
मुळात लटकेताईंना राजीनाम्याच्या जंजाळात अडकऊन अंधेरी ची उमेदवारी विश्वनाथ महाडेश्वर यांना देण्याचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे अनिल परब यांचा डाव, लटके वहिनींनी ओळखावा इतकच.....@News18lokmat@TV9Marathi@saamTVnews@abpmajhatv@zee24taasnews
— Manoj B Chavan (@ManojBChavan5) October 12, 2022
शिवसेना ठाकरे पक्षाचा प्लॅन B तयार
ऋतुजा लटके या बाळासाहेबांची शिवसेना असलेल्या शिंदे गटात जाण्याची चर्चा सुरू झाल्यानंतर ठाकरे गटाने सावध पावलं उचलत प्लॅन बी तयार ठेवला आहे. अंधेरी पोटनिवडणुकीत ठाकरे गटाकडून दुसऱ्या शिवसैनिकाला तिकीट देण्याची तयारी सुरू झाली आहे. याबाबत विश्वनाथ महाडेश्वर म्हणाले की, मुंबई महापालिकेकडून अद्याप ऋतुजा लटकेंचा राजीनामा मंजूर झाला नाही. कदाचित सत्ताधाऱ्यांचा आयुक्तांवर दबाव असेल. लोकशाहीत नियमानुसार काम करणं गरजेचे आहे. राजीनामा मंजूर न झाल्यास प्लॅन बी तयार आहे असं त्यांनी म्हटलं.
ऋतुजा लटकेंचा राजीनामा लटकला तर त्यांच्याऐवजी प्रमोद सावंत, विश्वनाथ महाडेश्वर आणि कमलेश राय यांना तयारीचे आदेश देण्यात आल्याची माहिती आहे. १४ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. हायकोर्टात ऋतुजा लटकेंच्या राजीनाम्याबाबत काय निर्णय होतो याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. या निर्णयात लटकेंच्या राजीनामाच्या बाजूने निर्णय न आल्यास प्लॅन बीनुसार ठाकरे गटाने याठिकाणी ३ जणांपैकी एकाला उमेदवारीची संधी देण्याची तयारी केली आहे. तर या जागेवर भाजपाच्या मुरजी पटेल यांचेही नाव भाजपा-बाळासाहेबांची शिवसेना युतीकडून चर्चेत आहे. परंतु अद्याप उमेदवारीची अधिकृत घोषणा झाली नाही.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"