मुंबई - प्राण्यांवरील हल्ले, मारहाण, हत्या यांसारख्या अत्याचारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. मुंबईतील वडाळा परिसरातही प्राणी अत्याचासंबंधीची चीड आणणारी घटना समोर आली आहे. आठवड्याभरापूर्वी वडाळ्यातील प्रतिक्षा नगर परिसरातील एका 'युवा' नावाच्या कुत्रीची निर्दयीपणे हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली होती. याप्रकरणी वडाळा टीटी पोलिसांनी दोन आरोपींपैकी एका आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.
(Animal Abuse : कुठे चाललोय आपण?; बकरीवरील सामूहिक बलात्काराच्या घटनेनं फरहान अख्तर उद्विग्न)
कुत्रीची हत्या केल्याप्रकरणी पी. तांबी आणि सूर्या नदार या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यापैकी मंगळवारी पोलिसांनी पी. तांबीला अटक केली असून सूर्या नदारचा शोध सुरू आहे. कुत्री केवळ अंगावर भुंकली म्हणून या दोघांनी तिला लोखंडी रॉडनं अमानुष मारहाण केली. या मारहाणीत कुत्रीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेबाबत पेटाच्या (PETA) मदतीनं वडाळा पोलिसांकडे तक्रार केल्याची माहिती स्थानिकांनी दिली.
दरम्यान, प्राण्यांबाबत कमालीचा तिटकारा असणाऱ्यांची संख्यादेखील मोठी आहे. काही दिवसांपूर्वी तर प्राण्यांवर बलात्कार करण्यात आल्याच्या संतापजनक घटनादेखील समोर आल्या आहेत.
हरियाणातील मेवात जिल्ह्यात गरोदर असलेल्या बकरीवर आठ जणांनी सामूहिक बलात्कार केला होता. बकरीच्या मालकानं 26 जुलैला या प्रकरणी पोलिसात तक्रार नोंदवली. नगीना पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक राजबीर सिंह यांनी सांगितले की, 'असलू नावाच्या व्यक्तीने 26 जुलैला ठाण्यात तक्रार नोंदवली. 25 जुलैला बकरीवर सवकर, हारून, जाफर आणि अन्य पाच जणांनी मिळून बलात्कार केला, असा आरोप असलू यांनी केला आहे'.
(Animal Abuse : संतापजनक ! मध्य प्रदेशात गोमातेवर बलात्कार,आरोपी गजाआड)
यानंतर मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यात गायीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली होती. राजगड जिल्ह्यातील सुठालिया परिसरात घडली होती. या अमानवीय कृत्यासाठी ग्रामस्थांनी एका वयोवृद्ध व्यक्तीवर संशय व्यक्त केला होता. मिळालेल्या माहितीनुसार, परिसरातील एक स्थानिक व्यापारी 3 ऑगस्टच्या रात्री घरी परतत असताना त्यांनी एका वयोवृद्ध व्यक्तीला गायीवर अत्याचार करताना पाहिले. याप्रकरणी छोटे खान असे नाव असलेल्या व्यक्तीवर संशय व्यक्त करण्यात आला होता. गावातील मंदिर परिसरातच छोटे खाननं गायीवर अत्याचार केल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली होती.