लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : रस्त्यावर चिरडणे, अत्याचार करणे तसेच जेवण देण्यास विरोध करणाऱ्यांविरोधात प्राणीप्रेमी आवाज उठवत आहेत. त्यामुळे प्राण्यांवर अत्याचार करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करत त्यांच्यावर कारवाईदेखील करण्यात येत आहे. खाकीतील प्राणीप्रेमी सुधीर कुडाळकर यांच्या लीगल टीमने आतापर्यंत अशी सव्वाशेहून अधिक प्रकरणे मार्गी लावली आहेत.
महाराष्ट्रातील प्राण्यांशी संबंधित ७८ ते ८० ग्रुपमध्ये कुडाळकर यांचा सहभाग आहे. यात त्यांना मार्गदर्शन करता करता त्यांनी गेल्यावर्षी २४ सप्टेंबर रोजी पाल अँँडोप्शन नावाने व्हॉट्सॲप ग्रुप तयार केला. सुरूवातीला १६० सदस्य होते. या ग्रुपच्या माध्यमांतून रस्त्यावरील आजारी प्राण्यांपर्यंत मदत पोहोचवली. सध्या मुंबईत असे एकूण ९ ग्रुप तयार करण्यात आले आहेत. यात दोन हजारांहून अधिक स्वयंसेवक कार्यरत आहेत.
तर दुसरीकडे प्राण्यांंवरील वाढते अत्याचार पाहता त्यांनी नोव्हेंबरमध्ये २५ वकिलांची लीगल टीम तयार केली. या टीमच्या माध्यमातून मोफत मार्गदर्शन करण्यात येत आहे. कुडाळकर सांगतात, आजही अनेक सोसायट्यांमध्ये मांजर, श्वानाला खाण्यासाठी देणे खटकते. त्यामुळे खाण्यासाठी देणाऱ्या व्यक्तींना विरोध करण्याचे प्रकार घडतात. प्राण्यांंना मारहाणीच्या घटनाही घडत आहेत. अशावेळी त्यांना कायद्याची भीती असणे गरजेचे आहे. आपण जे करतोय तो गुन्हा असल्याचे समजायला हवे.
कुडाळकर यांनी त्यांच्या टीमच्या मदतीने आतापर्यंत १२५ प्रकरणांपैकी ९० टक्के प्रकरणे मार्गी लावली आहेत. तर उर्वरित प्रकरणांवर काम सुरु असल्याचेही त्यांनी नमूद केले. कोरोनाच्या काळात प्रत्येकाने पुढे यायला हवे. आपली छोटीशी मदत त्याचा जीव वाचवू शकते, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.
....
कलाकारांचेही आवाहन
कोरोना काळात रस्त्यावरील प्राण्यांची काळजी घेण्यासाठी मराठी, हिंदी चित्रपट सृष्टीतील कलाकारांकडूनही नागरिकांना पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
....
कुठे अपघात तर कुठे लैंगिक अत्याचार
मुंबईत भरधाव वाहनाच्या धडकेत मांजर, श्वान जखमी किंवा मृत्यूमुखी पडताना दिसत आहेत. तर काही ठिकाणी श्वानाच्या लैंगिक अत्याचाराच्या घटनाही समोर आल्या. याप्रकरणी पोलिसांकडून गुन्हे नोंदवत संबंधितांवर कारवाई करण्यात आली आहे.
...