Join us

विद्यापीठात भरणार प्राण्यांची शाळा!

By admin | Published: November 12, 2014 1:09 AM

प्राणी आणि माणसाचे नाते दृढ करण्यासाठी विद्यानगरीत आता प्राण्यांची शाळा भरणार आहे.

मुंबई : प्राणी आणि माणसाचे नाते दृढ करण्यासाठी विद्यानगरीत आता प्राण्यांची शाळा भरणार आहे. मुंबई विद्यापीठाच्या बहि:शाल शिक्षण विभाग आणि संजीवन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईत पहिल्यांदाच ‘पेट डे’ अर्थात पाळीव प्राणी दिवस साजरा करण्यात येणार आहे. 16 नोव्हेंबर रोजी विद्यापीठाच्या विद्यानगरी कॅम्पसमध्ये आरोग्य केंद्राच्या आवारात सकाळी 1क् ते सायंकाळी 4 र्पयत  या वेळेत आयोजित करण्यात येणार आहे.
‘पेट डे’च्या निमित्ताने पशुवैद्यकीय तज्ज्ञ डॉ. उमेश करकरे त्यांच्या चमूसह उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यात पाळीव प्राण्यांची काळजी कशी घ्यावी, याविषयी माहिती देणार आहेत. शिवाय सोबत आणलेल्या पाळीव पक्षी, प्राणी आणि माशांचीही आरोग्य तपासणी विनामूल्य करून देण्यात येणार आहे.
केवळ कायदेशीरदृष्टय़ा योग्य असणा:या विदेशी प्राणी, पक्षी आणि या पाळीव प्राण्यांची आरोग्यचिकित्सा केली जाईल. शिवाय यावेळी प्राणीविषयक कायद्यांसंदर्भातही मार्गदर्शन करण्यात येणार आहे. पाळीव प्राण्यांचे खाद्य, वस्तू याची माहिती आणि याचे नमुनेही या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. या वेळी प्राणी-पक्षीप्रेमी 
एकमेकांना भेटून अनुभवही शेअर करू शकतात.
‘पेट डे’च्या अनोख्या सेलीब्रेशनमध्ये पाळीव प्राण्यांच्या मालकांनीही सहभागी व्हावे. शिवाय ज्यांना पाळीव प्राणी बाळगण्याची मनीषा आहे त्यांनीही अवश्य भेट द्यावी, असे आवाहन ‘संजीवन’च्या सुबोध गोरे यांनी आयोजकांच्या वतीने केले 
आहे. 
तसेच मुख्य म्हणजे जास्तीत जास्त लहान मुलांनीही या डेमध्ये सहभाग घेऊन मुक्या जिवांशी माणसाचे असणारे नाते समजून घ्यावे आणि मुक्या जिवांशी नव्याने नाते जोडावे, असेही आयोजकांनी सांगितले आहे. (प्रतिनिधी)