नेरळ : कर्जत तालुक्यात जिल्हा परिषद विभागस्तरावर पशु प्रदर्शन आयोजित केले आहे. बोरगाव येथील प्रदर्शनात गावठी आणि काही देशी जनावरांवर पशुधन अधिकाऱ्यांनी योग्य उपचार केले. दरम्यान, जनावरांवर स्थानिक पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार होणे ही शेतकरीवर्गासाठी प्रोत्साहित करणारी घटना आहे, असे गौरवोद्गार जिल्हा परिषद सदस्य सुदाम पेमारे यांनी काढले. खांडस जिल्हा परिषद प्रभागाचा पशु प्रदर्शन आणि उपचार मेळावा कळंबजवळील बोरगाव येथे आयोजित केला होता. यावेळी जिल्हा परिषद सदस्य पेमारे यांच्यासह कर्जत पंचायत समितीचे सदस्य धर्मा निरगुडा, स्थानिक ग्रामस्थ लक्ष्मण पोसाटे, पोलीस पाटील यांच्यासह कर्जत तालुक्यातील पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. मेळाव्यामध्ये पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक सिंग यांनी जनावरांवर कृत्रिम रोपण, तर डॉ. गोपालन यांनी जनावरांचे वंधत्व निवारण, तसेच डॉ. मिताली देवरे यांनी पशु खात्याच्या शासकीय योजनांची माहिती उपस्थित शेतकऱ्यांना दिली. यावेळी जनावरांची पाहणी करून औषधोपचारही करण्यात आले. डॉ. सर्वश्री अशोक सिंग, पवाली, अनुप्रिता जोशी, मिताली देवरे, गोपालन यांनी शिबिरासाठी आलेल्या जनावरांवर काही शस्त्रक्रिया केल्या, त्याबाबत जिल्हा परिषद सदस्य सुदाम पेमारे यांनी सर्व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे कौतुक केले. (वार्ताहर)
नेरळमध्ये पशु प्रदर्शनात जनावरांवर औषधोपचार
By admin | Published: February 11, 2015 10:32 PM