लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: दिवसागणिक वाढत जाणाऱ्या उकाड्यामुळे माणसे हैराण झाली आहेत. मात्र वाढत्या उष्म्याचा त्रास मुक्या जनावरांनाही होत आहे. डोळे चुरचुरणे, त्वचारोग, नाकातून रक्तस्त्राव होणे असे त्रास पशू-पक्ष्यांना होत आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा या रुग्णांमध्ये ३०-४० टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती पशुवैद्यकीय तज्ज्ञांनी दिली, तसेच कबुतरांमध्ये अधिक मृत्यूदर असल्याचेही अधोरेखित केले.
याविषयी, परळ बैलघोडा रुग्णालयाचे व्यवस्थापक डॉ. मयूर डंगर यांनी सांगितले, यंदा रुग्णालयातील उष्माघाताचे रुग्ण वाढले आहेत. त्यात बगळे, कावळे, घुबड, घार, कासव, गरुड, पोपट आणि कबुतर यांचा समावेश आहे. तसेच, या रुग्णांमधील कबतुरांमध्ये उष्माघातामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे. उष्माघाताचा त्रास झालेले हे रुग्ण औषधोपचारानंतर दोन ते तीन दिवसांत बरे होतात. मात्र कबुतरांमध्ये त्रासाची तीव्रता अधिक असल्याने दररोज साधारण एका मृत्यूची नोंद होत आहे. हे रुग्ण वन्यजीवनातील असतील तर बरे झाल्यानंतर प्राणी संस्थांच्या मदतीने त्यांना उचित स्थळी सोडण्यात येते.
तळपत्या सूर्यापासून वाचण्यासाठी पशु-पक्षी सावलीत बसतात. मात्र सावलीत बसण्यासारखे उपाय फार काळ त्यांना उष्म्यापासून वाचवू शकत नाहीत. ज्या प्राण्यांना उष्म्याचा फटका बसतो, अशा प्राण्यांना तातडीने उपचार न मिळाल्यास त्यांचा जीव जाण्याची शक्यता असते, असे डॉक्टरांनी सांगितले.
काळजी कशी घ्यावी?
- पाळीव प्राण्यांनाही उष्माघाताचा फटका बसू शकतो. पाळीव प्राणी बहुतांश वेळ घरातील चार भिंतीत व्यतित करतात.
- घरातील तापमान आणि बाहेरील तापमानात फरक असतो. या पाळीव प्राण्यांना सारखे घराबाहेर घेऊन गेल्यास ते अस्वस्थ होतात.
- प्राण्यांना पहाटे किंवा सायंकाळी सहानंतर फेरफटक्यासाठी घेऊन जावे. प्राण्यांचे जेवण नेहमी ताजे असावे. खिडकीवर, बाल्कनीत छोटेखानी भांड्यात पक्ष्यांसाठी पाणी काढून ठेवावे.
- दोन-तीन तासांनंतर हे पाणी बदलावे. पाळीव प्राण्यांना थेट उन्हामध्ये बांधू नये. त्यांची नियमित स्वच्छता करावी. स्वत:च उपचार देण्याऐवजी पशुवैद्यकांचा सल्ला नेहमी घ्यावा.
पक्ष्यांना उष्म्याचा मोठा फटका बसतो. पक्षी सतत आकाशात उडत असल्याने उष्ण वाऱ्याचा त्यांना सामना करावा लागतो. यामुळे त्यांना दम लागतो, तसेच हिट स्ट्रोकही होतो. यामुळे ते भोवळ येऊन पडतात. अनेक प्राणीप्रेमी अशा पक्ष्यांना रुग्णालयात दाखल करतात. घार, घुबड, कोकीळ, पोपट, चिमणी आदी पक्ष्यांना डिहायड्रेशन, हिट स्ट्रोकचा त्रास होऊ शकतो. अशावेळी नागरिकांनी पशू-पक्ष्यांना त्रास होणार नाही, या दृष्टीने काळजी घ्यावी आणि वेळ आल्यास तत्काळ त्यांना पशू रुग्णालयात दाखल करावे. - डॉ. मयूर डंगर, पशुवैद्यकीय तज्ज्ञ, रुग्णालय व्यवस्थापक, बैलघोडा रुग्णालय (परळ)