Join us

जानवर मुंबईतल्या घातपाताची जबाबदारी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 4:09 AM

चौकशीसाठी एटीएस पथक दिल्लीत दाखलजानवर मुंबईतल्या घातपाताची जबाबदारी?चौकशीसाठी एटीएस पथक दिल्लीत दाखललोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ...

चौकशीसाठी एटीएस पथक दिल्लीत दाखल

जानवर मुंबईतल्या घातपाताची जबाबदारी?

चौकशीसाठी एटीएस पथक दिल्लीत दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : सणासुदीच्या काळात घातपाताच्या तयारीत असलेल्या दहशतवाद्यांंना दिल्ली पोलिसांनी बेड्या ठोकल्या. यात अटकेत असलेल्या धारावीतील जान मोहम्मद शेखकडे मुंबईतील घातपाताची जबाबदारी सोपविण्यात येणार होती, अशी माहिती तपास यंत्रणांच्या सूत्रांकडून समजते. जानच्या चौकशीसाठी राज्य दहशतवादविरोधी पथक (एटीएस) गुरुवारी दिल्लीत दाखल झाले आहे.

धारावीत राहणाऱ्या जानला राजस्थानच्या कोटा स्थानकातून १३ तारखेला अटक केली आहे. तो २० वर्षांपूर्वी डी गँगसाठी काम करीत असल्याने तोही एटीएसच्या रडारवर होता. जानला मुंबईत अनेक वर्षे टॅक्सी चालविण्याचा अनुभव आहे. त्यामुळे त्याला मुंबईच्या रस्त्यांची खडान्खडा माहिती आहे. त्याच्यावर मुंबईत घातपात घडवून आणण्याची जबाबदारी सोपवण्यात येणार होती, अशी माहिती समोर येत आहे. याबाबत तपास यंत्रणा अधिक खातरजमा करीत आहेत.

जानसंबंधित असलेली माहिती एटीएस पथक दिल्ली पोलिसांना देणार आहे. तसेच त्यांच्याकडील माहितीच्या आधारे एटीएसच्या तपासाची पुढील रूपरेषा ठरणार आहेत. दहशतवाद्यांंचा मुंबईत नेमका काय कट होता? जानचा नेमका सहभाग काय होता? तो त्यांच्या संपर्कात कधी व कसा आला? तसेच मुंबईत आणखी कितीजण त्याच्या संपर्कात आहेत? आदी विविध माहितीच्या चौकशीसाठी एटीएसचे पथक दिल्लीत दाखल झाले. तेथे दिल्ली पोलिसांच्या परवानगीने ते जानकडे चौकशी करणार आहेत.

अटकेत असलेल्या दहशतवाद्यांंकडून अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत; तर काहीजण पोलिसांची दिशाभूल करण्याचाही प्रयत्न करीत आहे. ही मंडळी पाकिस्तानी हँडलर्सच्या संपर्कात होते. त्यांचे मोबाइलही दिल्ली पोलिसांनी जप्त केले आहेत.

.....

मित्रांंकडे चौकशी सुरू

जान मोहम्मदच्या पत्नी, मुलगी आणि इतर जवळच्या व्यक्तीची पोलीस, एटीएसकडून चौकशी केली जात आहे. जान मोहम्मदला एकदा अजमेर आणि दुसऱ्या वेळी निजामुद्दीन येथे जाण्यासाठी तिकीट काढून देणारा धारावीतील मोहम्मद असगर शेखची मंगळवारी रात्रीपासून चारवेळा चौकशी करण्यात आली आहे.