प्राण्यांवर आता मोबाईल पेट वाहिनीच्या द्वारे होणार अंत्यसंस्कार; भारतातील पहिला उपक्रम
By मनोहर कुंभेजकर | Published: July 9, 2023 06:58 PM2023-07-09T18:58:30+5:302023-07-09T18:58:37+5:30
बोरिवली पश्चिमेकडील आय सी कॉलनीत भारतातील पहिल्या मोबाईल पेट अंत्यसंस्कार वाहिनीचे उद्घाटन करण्यात आले.
मुंबई- शहरातील पाळीव व भटक्या प्राण्यांची वाढती संख्या लक्षात घेता प्रण्यांचे निधन झाल्यावर अंत्यसंस्कार कसे करायचे यांची चिंता प्राणी प्रेमींना असते मात्र अश्याप्रारची सोय मुंबईत कमी ठिकाणी उपलब्ध असून मोठ्याप्रमाणात शुल्क आकारले जाते त्यांच्यासाठी सोयीस्कर, आदरयुक्त व विधिवत अंत्यसंस्कार आता त्याच्या रहात्या ठिकाणी मुंबईत शक्य होणार आहेत. भारतातील अशा प्रकारची ही पहिलीच मोबाईल पेट अंत्यवाहिनी असून प्रभाग क्रमांक १ च्या शिवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी अभिषेक घोसाळकर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवला जाणार आहे.
या प्रसंगी माजी नगरसेविका तेजस्वी अभिषेक घोसाळकर, हॅप्पी बड्स फाऊंडेशन अध्यक्ष- अमरदिप मोठेराव, किरण सुरसे -पोलिस निरीक्षक, ईवोन डिसोझा, शाखा संघटक ज्यूडीथ मेंडोसा, युवा सेनेचे जितेन परमार, दर्शीत कोरगावकर तसेच प्राणी प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बोरिवली पश्चिमेकडील आय सी कॉलनीत भारतातील पहिल्या मोबाईल पेट अंत्यसंस्कार वाहिनीचे उद्घाटन आज सेंट लुईस चर्चचे फादर रोनाल्ड फर्नांडिस यांच्या हस्ते बोरिवली पश्चिमेकडील आय सी कॉलनी पेट पार्क वायएमसीए ग्राउंड जवळ करण्यात आले. सदर अंत्य वाहिनी पूर्णतः पर्यावरण पूरक असून यातील विद्युत दाहिनीत मृत प्राण्यांवर अंत्यसंस्कार होणार आहेत. यामुळे दहिसर- बोरिवली येथील प्राण्यांवर या ठिकाणी अंत्यसंस्कार होणार आहेत. हॅपी बडस फाउंडेशन या अशासकीय संस्थेने या व्हॅनची उभारणी केल्याची माहिती मुंबै बँकेचे बँकेचे संचालक, माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांनी दिली. तसेच या ठिकाणी भटक्या प्राण्यांवर मोफत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. अंत्यसंस्कार वाहिनीसाठी 8976741188 या टोल फ्री नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन अभिषेक घोसाळकर यांनी केले आहे.