अनिक्षाने सुरक्षा भेदून काढले हाेते फाेटाे;अनोळखी नंबरवरून व्हाॅईस नोट,व्हिडीओ क्लिप पाठवली
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 08:13 AM2023-03-28T08:13:29+5:302023-03-28T08:13:38+5:30
डिझाइन केलेली वस्त्रे अमृता फडणवीस यांनी सार्वजनिक कार्यक्रमात परिधान केली तर त्याचे प्रमाेशन होईल, असे तिला वाटत होते.
मुंबई : अनिक्षाने अमृता फडणवीस यांना पाठविलेल्या एका मेसेजमध्ये म्हटले हाेते की, तुम्हाला माझे वडील कोण आहेत ते माहिती नाही. माझे वडील शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्या सतत संपर्कात आहेत आणि ते हे व्हिडीओ त्यांना पाठवतील. हा नियोजित कट असून अनिक्षाने उच्च पातळीवर सुरक्षा असलेल्या ठिकाणी फोटो काढले आहेत. या सर्व बाबी तपासाव्या लागतील, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी न्यायालयात केला.
तिने डिझाइन केलेली वस्त्रे अमृता फडणवीस यांनी सार्वजनिक कार्यक्रमात परिधान केली तर त्याचे प्रमाेशन होईल, असे तिला वाटत होते. त्यामुळे तिने अमृता यांना तिने डिझाइन केलेल्या वस्तू परिधान करण्याची विनंती केली, अशी माहिती पोलिसांनी दिली. अमृता यांचा विश्वास संपादन केल्यानंतर तिने अमृता यांना काही बुकींची माहिती देण्याची तयारी दर्शविली. त्याद्वारे पैसे कमावता येतील. त्यानंतर तिने तिचे वडील अनिल जयसिंघानी यांना एका गुन्ह्यातून बाहेर काढण्यासाठी अमृता यांना एक कोटींची लाच देण्याचा प्रयत्न केला.
तिच्या या वागण्यावर नाराज होऊन त्यांनी तिचा नंबर ब्लॉक केला. मात्र, तिने अनोळखी नंबरवरून त्यांना व्हाॅईस नोट, व्हिडीओ क्लिप पाठविल्या, असे पोलिसांनी अनिक्षाच्या जामिनाला विरोध करताना सांगितले. अनिक्षाला जामीन दिला तर ती तपास कामात अडथळा आणण्याची शक्यता आहे. तसेच तक्रारदाराला धमकावण्याची भीती आहे, असा दावा सरकारी वकिलांनी न्यायालयात केला. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यावर अनिक्षाची जामिनावर सुटका केली. तिला पोलिसांकडे पासपोर्ट जमा करण्याचे व मुंबई न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रातच राहण्याचा आदेश दिला.
... म्हणून मुलीला जामीन द्यायचा नाही का?
जर आरोपीची जामिनावर सुटका केली, तर ती अमृता यांना धमकावेल. तपासात अडथळा निर्माण करेल. ती सोशल मीडिया, प्रसारमाध्यमांपुढे जाईल. ती अमृता व देवेंद्र फडणवीस यांना बदनाम करेल. तसेच ती फरार होण्याचीही शक्यता आहे, असे सरकारी वकिलांनी म्हटले. त्याला अनिक्षाचे वकील मृगेंद्र सिंग यांनी आक्षेप घेतला. केवळ उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीने तक्रार केली म्हणून अनिक्षाला कोठडीत ठेवता येईल का? वडिलांवर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत म्हणून मुलीला जामीन द्यायचा नाही का?