अंनिसची मुंबईत निर्भय रॅली, पुण्यात निषेध जागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 05:07 AM2017-08-18T05:07:26+5:302017-08-18T05:07:28+5:30
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खूनाचा जाब विचारण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने निर्भय रॅली काढण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खूनाचा जाब विचारण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने निर्भय रॅली काढण्याचा निर्णय घेतला आहे. दादरच्या वीर कोतवाल उद्यानापासून चैत्यभूमीपर्यंत रविवारी, २० आॅगस्ट रोजी दुपारी ३ वाजता ही रॅली काढली जाईळ.
दाभोलकर यांचा खून होऊन ४ वर्षे उलटल्यांतरही खुनाचा तपास लागलेला नाही. त्यांच्यानंतर कॉम्रेड गोविंद पानसरे आणि प्रा. कलबुर्गी यांचेही खून झाले असून मारेकरी अद्याप फरार आहेत. त्यांचा तपास कधी लागणार? हाच प्रश्न विचारत ही हिंसाविरोधी ‘निर्भय रॅली’ आयोजित केल्याचे अंनिसने स्पष्ट केले. वीर कोतवाल उद्यानाहून सेना भवनमार्गे प्रबोधनकार ठाकरे पुतळ करत सेनापती बापट पुतळ््यासमोरून चैत्यभूमी येथे रॅलीचा समारोप केला जाईल.
निर्भय रॅलीआधी दुपारी ३ ते ३.३० वाजेदरम्यान वीर कोतवाल उद्यान येथे मान्यवरांची भाषणे आणि गीतांचा कार्यक्रम पार पडेल. त्यानंतर दुपारी ३.३० वाजता रॅलीला सुरूवात होईल, तर सायंकाळी ४.३० वाजता रॅली चैत्यभूमीवर धडक देईल. त्यानंतर सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत पालघर विभागातर्फे ‘जवाब दो’ गीत व इतर गीते सादर केली जातील. सायंकाळी ६ वाजेपर्यंत मान्यवरांकडून उपस्थितांना संबोधित केले जाईल.
या रॅलीत महाराष्ट्र अंनिससोबत आभा परिवर्तनवादी संघटना, राष्ट्र सेवा दल, छात्र भारती, विद्यार्थी भारती, शिक्षक भारती, भाकप, माकप, नशाबंदी मंडळ, प्रजासत्ताक संघटना, सद्भावना मंच, एआयडब्ल्यूए, एसएफआय, डीवायएफआय, सीटू, जनता दल , सर्वोदय, मैत्री संस्था, आयुष्यमान, माथाडी कामगार संघटना, वसईची विवेक मंच, निर्भय मंच व सेवा दल, स्त्री मुक्ती संघटना, गिरणी कामगार संघर्ष समिती, अन्वय व्यसनमुक्ती केंद्र, जमात ए इस्लाम-हिंद, ज्येष्ठ नागरिक महासंघ, मालवणी युवा परिषद, उमंग, मेकिंग मुंबई कॅम्पेन, आरंभ, व्हीजेटीआय मागासवर्गीय संघटना, श्रमिकराज जनरल कामगार युनियन, हेमलकसा प्रकल्प-मुंबई टीम, तसेच इतर अनेक संघटना सामील होणार आहेत.
>‘निषेध जागर’
पुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला चार वर्ष पूर्ण होत आले. परंतु,तरीही त्यांच्या मारेक-यांना पकडण्यात राज्य शासन व सीबीआयकडून दिरंगाई केली जात आहे. त्यामुळे अंधश्रध्दा निर्मूलन समितीतर्फे (अंनिस) येत्या १८ ते २० तारखेदरम्यान दाभोलकरांच्या चौथ्या स्मृतिदिनानिमित्त ‘निषेध जागर’ केला जाणार आहे.