तळपायाची आग मस्तकात गेली, खडसेंच्या आरोपावर अंजली दमानिया संतापल्या
By महेश गलांडे | Published: October 22, 2020 01:46 PM2020-10-22T13:46:13+5:302020-10-22T13:47:32+5:30
देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज असल्यामुळे पक्ष सोडत असल्याची घोषणा करताना खडसेंचा गळा भरून आला होता. मात्र, आपल्यावर खालच्या पातळीचं राजकारण झाल्याचं खडसेनी म्हटलं.
मुंबई - भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी अखेर भाजपला सोडण्याची घोषणा केली आहे. पक्ष सोडत असताना एकनाथ खडसे यांनी भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती आरोप केले आहे. फडणवीस यांच्या सांगण्यावरून माझ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, असा गौप्यस्फोट खडसेंनी केला. यावेळी, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांचे नाव घेत खडसेंनी फडणवीसांवर आरोप केले. त्यामुळे, अंजली दमानिया यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच, याप्रकरणी आपण सविस्तर उत्तर देणार असल्याचंही दमानिया यांनी म्हटलंय.
देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज असल्यामुळे पक्ष सोडत असल्याची घोषणा करताना खडसेंचा गळा भरून आला होता. मात्र, आपल्यावर खालच्या पातळीचं राजकारण झाल्याचं खडसेनी म्हटलं. ''एका महिलेने विनयभंगाची खोटी तक्रार माझ्याविरुद्ध केली होती. अंजली दमानिया यांनी माझ्यावर हा आरोप लावला, त्यानंतर सांताक्रुझ पोलीस ठाण्यात जाऊन रात्रभर गोंधळ घातला. याप्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरुन पोलिसांनी माझ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. तेथील पोलीस निरीक्षकांनीच मला याबाबत माहिती दिली, ते म्हणाले स्वत: मुख्यमंत्र्यांनीच गुन्हा दाखल करायला सांगितलंय. त्यानंतर मी मुख्यमंत्र्यांकडे गेलो, त्यांच्याकडे जाऊन यासंदर्भात विचारणा केली. त्यावेळी, त्या महिला रात्रभर गोंधळ घालत होत्या, त्यामुळे गुन्हा दाखल करायला लावलं. पुन्हा मागे घेऊयात, असं तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. याप्रकरणामुळे माझी मोठी बदनामी झाली, एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन माझ्याविरुद्ध राजकारण केलं गेलं, म्हणून मी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचं खडसेंनी सांगितलं.
खडसेंच्या आरोपामुळे अंजली दमानिया यांनी तळपायाची आग मस्तकात गेल्याचं म्हटलंय. ''एकनाथ खडसे कालच्या पत्रकार परिषदेत माझ्या बद्दल काही वक्तव्य केलं. यावर मी न बोलण्याचा निर्णय घेतला कारण तेव्हा मी घरी नव्हते आणि ते काय म्हणाले हे मी प्रत्यक्ष ऐकले नव्हते. पण रात्री मी जेव्हा ऐकलं तेव्हा तळपायाची आग मस्तकात गेली. आज सायंकाळी 4.30 वाजता मी यासंदर्भात पत्रकार परिषद घेणार आहे,'' असेही अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे.
एकनाथ खडसे कालच्या पत्रकार परिषदेतल्या वक्तव्यावर मी न बोलण्याचा निर्णय घेतला होता कारण ते काय म्हणाले हे मी प्रत्यक्षात ऐकले नव्हते.पण रात्री मी जेव्हा ऐकले तेव्हा तळ पायाची आग मस्तकात गेली
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) October 22, 2020
याच विषयावर आज मी मुंबई मराठी पत्रकार संघात संध्याकाळी ४.३० वाजता पत्रकार परिषद घेणार आहे
फडणवीस म्हणाले
देवेंद्र फडणवीस हे मराठवाडा पाहणी दौऱ्यावर असून पत्रकारांनी खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाबद्दल त्यांना विचारले होते. त्यावर बोलताना, खडसेंनी भाजपाचा राजीनामा दिल्याची अधिकृत माहिती मला मिळाली नाही, खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाबद्दल पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आपली प्रतिक्रिया देतील, अशा शब्दात फडणवीस यांनी आपलं मत व्यक्त केलं. तसेच, मला अधिकृत माहिती मिळाल्यानंतर मी यासंदर्भात बोलेल, असंही फडणवीस यांनी म्हटलं.
दिल्या घरी सुखी राहावं
राष्ट्रवादीत प्रवेशाचा एकनाथ खडसेंचा निर्णय त्यांच्यासाठी अत्यंत दुर्दैवी आहे, ज्या पक्षात त्यांचं राजकीय करिअर घडलं. बाजार समितीपासून ते महसूल मंत्र्यांपर्यंत त्यांनी मजल मारली होती. तो पक्ष खडसेंनी सोडून जायला नव्हते पाहिजे, असे रावसाहेब दानवेंनी म्हटलंय. नाथाभाऊंबद्दल पक्षातील कुणाच्याही मनात दुमत नाही. नाथाभाऊंना पक्षाकडून नक्कीच उभारणी मिळाली असती, पण त्यासाठी काही काळ जाणं महत्त्वाचं असंत. काही न्यायालयीन बाबींची पूर्तता होणं गरजेचं होत. नाथाभाऊ आणचे चांगले मित्र आहेत. पण, आता जिथे गेलेत, तिथं त्यांनी सुखी राहावे, असेही रावासाहेब दानवेंनी म्हटले आहे.
सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया
एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर भाजपाकडून सुधीर मुनगंटीवार यांनी पहिली प्रतिक्रिया देताना, वो जाने वाले हो सके तो लौट के आना.. असे म्हटले आहे. मनाविरुद्ध घडत असतानाही काम करणं म्हणजे भारतीय जनता पक्ष, असे प्रमोद महाजनांनी म्हटलं होतं. एकनाथ खडसेंनी त्या प्रमोद महाजनांसोबत काम केलंय. पण, एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रवेश ही धक्कादायक बातमी आहे. तसेच पक्षासाठी चिंतनाची बाब आहे, असं मला वाटतं. पक्षाला खडसेंसारखा नेता, ज्यांनी 40 वर्षे पक्षांची सेवा केले ते आज राष्ट्रवादाचा बुरखा पांघरलेल्या राष्ट्रवादीत जात आहेत, हे धक्कादायक आहे. मीही त्यांच्या नेतृत्वात काम केलंय. त्यामुळे, एकनाथ खडसेंना मी एवढचं म्हणू शकतो, ओ जानेवाले हो सके तो लौट के आना.. असे म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर प्रतिक्रिया दिलीय.