अतिषा नाईक यांना नाट्यगृहात दुखापत
By Admin | Published: March 23, 2015 01:10 AM2015-03-23T01:10:18+5:302015-03-23T01:10:18+5:30
पालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा फटका शनिवारी अभिनेत्री अतिषा नाईक यांना बसला. अंधारात दडलेल्या उघड्या चेंबरमध्ये पाय अडकून त्यांना दुखापत झाली.
प्रशांत शेडगे ल्ल पनवेल
पालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा फटका शनिवारी अभिनेत्री अतिषा नाईक यांना बसला. अंधारात दडलेल्या उघड्या चेंबरमध्ये पाय अडकून त्यांना दुखापत झाली. त्यामुळे त्यांचा पारा चढला आणि आणि मग पडद्यावरील अभिनय विसरून नाईक यांनी पालिका प्रशासनाला लाखोली वाहिली. तक्र ार पुस्तिकेत ‘तुम्ही काय एखाद्याचा जीव जाण्याची वाट पाहणार आहात का?’ असा अभिप्राय देऊन त्यांनी पालिकेच्या डोळ्यांत अंजन घातले.
पनवेलकरांचे सांस्कृतिक जीवन समृद्ध व्हावे म्हणून, कोट्यवधी रुपये खर्च करून पालिका प्रशासनाने नाट्यगृह उभारले. पालिका आणि सत्ताधारी या नाट्यगृहाची मुंबई, डोंबिवली, कल्याणच्या नाट्यगृहाशी छातीठोकपणे तुलना करतात, मात्र या गोष्टी फोल असल्याचे या ठिकाणी असलेल्या गैरसोयींवरून स्पष्ट झाले आहे. आद्य क्र ांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात दररोज अनेक प्रयोग आणि कार्यक्रम होतात. या सभागृहाच्या तारखासुद्धा कायम भरलेल्या असतात. गेल्या काही महिन्यांत अनेक दर्जेदार नाटके या रंगमंचावर सादर झाली आहेत. मराठी नाट्य, कला व सिनेसृष्टीतील बहुतांशी कलाकारांनी या ठिकाणी हजेरी लावली आहे. त्यापैकी कित्येकांनी या ठिकाणी असलेल्या त्रुटी दूर करण्याच्या सूचना व्यवस्थापनाला दिल्या. मात्र पालथ्या घड्यावर पाणी. त्याचा फटका कलाकार आणि श्रोत्यांना बसला आहे.
गुढीपाडव्याला या रंगमंचावर ‘वाऱ्यावरची वरात’ या नाटकाचा प्रयोग झाला. यानिमित्ताने अतिषा नाईक पनवेलला आल्या होत्या. प्रयोग संपल्यानंतर त्या परतीच्या प्रवासाकरिता व्हीआयपी पार्किंगकडे असताना त्यांचा पाय चेंबरमध्ये अडकला आणि इजा झाली. चेंबर अर्धवट उघडे होतेच; शिवाय
विजेची सोय नसल्याने अंधारात काहीच दिसले नाही. व्यवस्थापक अरविंद कोळी यांनी अतिषा नाईक यांची माफी मागून, याबाबत त्वरित उपाययोजना करण्याची ग्वाही
देत त्यांचा रांग शांत करण्याचा
प्रयत्न केला.