..अन‌् टान्झानियन नागरिकावर मुंबईत अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:05 AM2021-05-24T04:05:57+5:302021-05-24T04:05:57+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : आंतरराष्ट्रीय प्रवासबंदीमुळे मुंबईत अडकून पडलेल्या एका टान्झानियन नागरिकाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करून सांताक्रुझ येथील सामाजिक ...

..Ann Tanzanian citizen cremated in Mumbai | ..अन‌् टान्झानियन नागरिकावर मुंबईत अंत्यसंस्कार

..अन‌् टान्झानियन नागरिकावर मुंबईत अंत्यसंस्कार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : आंतरराष्ट्रीय प्रवासबंदीमुळे मुंबईत अडकून पडलेल्या एका टान्झानियन नागरिकाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करून सांताक्रुझ येथील सामाजिक कार्यकर्त्याने माणुसकीचे दर्शन घडविले. नौशादअली टंकसाळ असे त्यांचे नाव असून, परदेशी व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या त्यांनी स्वखर्चाने मिळविल्या.

टान्झानियात पुरेशा आरोग्य सुविधा नसल्याने तेथील डॉक्टरांनी या व्यक्तीला मुंबईत उपचार घेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार नानावटी रुग्णालयात त्यांच्यावर काही महिन्यांपासून उपचार सुरू होते. मल्टिऑर्गन फेल्युअरमुळे अलीकडेच त्यांचा मृत्यू झाला. मृतदेह हवाईमार्गे टान्झानियाला नेण्याचा निर्णय नातेवाइकांनी घेतला. परंतु, आंतरराष्ट्रीय प्रवासबंदीमुळे अडचणी आल्या. त्यामुळे मृतदेहावर मुंबईत अंत्यसंस्कार करण्यावाचून दुसरा पर्याय उरला नाही. पण मुंबईत ना कोणी ओळखीचे होते, ना हिंदी किंवा इंग्रजी भाषा येत होती. मग स्मशानभूमीत अंत्यसंस्काराची परवानगी देणार कोण, असा नवा पेच निर्माण झाला.

केनियात असलेल्या एका मित्राकडून ही बाब नौशादअली यांना कळली. त्यांनी तातडीने नानावटी रुग्णालय गाठून मृत व्यक्तीच्या मुलाची भेट घेतली आणि सर्वप्रकारची मदत करू, असा धीर दिला. परदेशी नागरिकावर भारतात अंत्यसंस्कार करण्यासाठी विविध प्रकारच्या परवानग्या लागतात याची जाणीव त्यांना लवकरच झाली. त्यांनी स्वखर्चाने त्या परवानग्या मिळवल्या. परवानगी अर्जासोबत स्वतःची ओळखपत्रे जोडली आणि पोलीस, पालिकेचे नाहरकत प्रमाणपत्र घेतले. तातडीने सांताक्रुझ दफनभूमी गाठली. तेथील प्रमुखांना परिस्थिती सांगून त्यांचाही होकार मिळवला आणि अंत्यसंस्कार पार पाडले.

..............

टान्झानियात झाला भव्य सत्कार

मृत व्यक्तीचे नातेवाईक मायदेशी परतल्यानंतर त्यांनी नौशादअली यांना टान्झानियात येण्याचे निमंत्रण दिले. व्हिसा पाठवला. पण प्रवासावरील निर्बंध कायम असल्याने त्यांना जाता आले नाही. व्हिसाची मुदत संपली तेव्हा नवा व्हिसा पाठविण्यात आला. त्यामुळे त्यांचे निमंत्रण स्वीकारणे अपरिहार्ह बनले. तेथे पोहोचल्यावर भव्य सत्कार करण्यात आला. व्हीआयपी सुविधा, पंचतारांकित हॉटेलमध्ये सोय आणि आफ्रिकेची सफर घडवून त्यांनी ऋण व्यक्त केले, अशी माहिती नौशादअली यांनी दिली.

..........

त्या मृतदेहावर वेळेत अंत्यसंस्कार झाले नसते तर आपल्या देशाची वाईट प्रतिमा आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झाली असती, त्यामुळे मदत करण्याचा निर्णय घेतला. इंग्रजी किंवा भारतीय भाषा येत नसल्याने त्यांना मार्ग गवसत नव्हता. माझा पाठपुरावा आणि आपल्या यंत्रणांच्या सहकार्यामुळे सर्व शक्य झाले.

- नौशादअली टंकसाळ, सामाजिक कार्यकर्ते, सांताक्रुझ

Web Title: ..Ann Tanzanian citizen cremated in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.