Join us

अण्णांनी उत्तम अभिनय केला; जितेंद्र आव्हाडांकडून अण्णा हजारेंच्या उपोषणाची खिल्ली

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2019 1:38 PM

लोकपाल आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी 6 दिवस उपोषण केले. अखेर, मुख्यमंत्र्यानी अण्णांच्या आग्रही मागण्या मान्य केल्यानंतर सातव्या दिवशी अण्णांनी उपोषण सोडले.

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंच्या उपोषणाची खिल्ली उडवली आहे. अण्णांचे उपोषण हे स्क्रीप्टेड असल्याचा आरोपच आव्हाड यांनी केला आहे. सन 2014 ते 2019 या कालावधी मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर आली, पण अण्णा बोलले नाहीत. आता, त्यांना स्क्रीप्ट लिहून दिली, त्यांनी उत्तम अभिनय केला आणि आपण मुर्खासारखे चर्चा करतो, असे आव्हाड यांनी आपल्या ट्विटरवरुन म्हटले आहे. 

लोकपाल आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी 6 दिवस उपोषण केले. अखेर, मुख्यमंत्र्यानी अण्णांच्या आग्रही मागण्या मान्य केल्यानंतर सातव्या दिवशी अण्णांनी उपोषण सोडले. तत्पूवी, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसह अनेक राजकीय नेत्यांनी अण्णांना उपोषण सोडण्याची विनंती केली होती. अण्णांच्या प्रकृतीची आम्हाला काळजी असल्याचंही अनेक नेत्यांनी म्हटलं होतं. मात्र, आता अण्णांनी उपोषण सोडल्यानंतर अण्णांचे आंदोलन हे स्क्रीप्टेड असून त्यांनी उत्तम अभिनय केल्याचं राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी अण्णांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यानंतर, अजित पवार यांनी अण्णांची जाहीरपणे माफी मागतली होती. तसेच अण्णा हे ज्येष्ठ समाजसेवक असून त्यांनी आमच्या सत्ताकाळातही आंदोलने केली. त्यावेळी, आम्ही वेळोवेळी अण्णांच्या आंदोलनाची दखल घेतल्याचे अजित पवार यांनी म्हटले सांगितले होते. 

दरम्यान, ‘अण्णा हजारे हे संघाचे एजंट आहेत’ असे वक्तव्य नवाब मलिक यांनी केले होते. त्यानंतर, आता जितेंद्र आव्हाड यांनी अण्णांचे आंदोलन स्क्रीप्टेड असून त्यांनी उत्तम अभिनय केल्यांच म्हटलं आहे. त्यामुळे आता, अजित पवार पुन्हा एकदा अण्णांची माफी मागणार की जितेंद्र आव्हाड यांची कानउघडणी करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.  

टॅग्स :जितेंद्र आव्हाडअण्णा हजारेआंदोलनराष्ट्रवादी काँग्रेस