अण्णाभाऊ साठेंवरील चित्रपटासाठी पुढाकार घेणार - मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2019 05:53 AM2019-08-02T05:53:55+5:302019-08-02T05:54:44+5:30
मातंग समाजासाठी एक लाख घरे
मुंबई : भटक्या विमुक्त समाजाच्या व्यथा-वेदनांना सर्वप्रथम देशासमोर, समाजासमोर मांडणारे पहिले नेते अण्णा भाऊ साठे होते. अण्णाभाऊंच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांचे विचार समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील. त्यांच्या जीवनावर चित्रपट तयार करण्यासाठी राज्य सरकार पुढाकार घेईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिली. मातंग समाजाच्या विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
वांद्रे येथील रंगशारदा सभागृहातील कार्यक्रमाने आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरुवात झाली.
मुख्यमंत्री म्हणाले, चार वर्षांत मातंग समाजासाठी एक लाख घरे उभारण्यात येतील. यापैकी पहिल्या टप्प्यातील १९ हजार घरांसाठी निधी वितरित करण्यात आला आहे. चिरागनगर येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचे कामही लवकरच पूर्ण करण्यात येईल. पुणे येथे लहूजी साळवे यांच्या स्मारकासाठी पाच एकर जमीन आरक्षित करण्यात आली आहे. या स्मारकासाठीही आवश्यक तो निधी दिला आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित चित्रपटासाठी आवश्यक निधी देण्यात येईल. क्रांतिवीर लहूजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाने मातंगांच्या विकासासाठी केलेल्या शिफारशींचीही अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे मुख्यमं^त्र्यांनी सांगितले.
महसूलमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, सर्वसामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी अण्णाभाऊ साठे यांनी सदैव प्रयत्न केले. अर्थमंत्री मुनगंटीवार म्हणाले, अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त टपाल तिकिटाचे प्रकाशन करण्याचे भाग्य आम्हाला लाभले. वंचितांसाठी लढणाऱ्या अण्णांचे टपाल तिकीट केंद्र सरकारने केवळ आठच दिवसांत मंजूर केले. वंचितांच्या विकासासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे यांनी अण्णाभाऊंच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त वर्षभर महामंडळामार्फत विविध कार्यक्रम होणार असल्याचे सांगितले. मान्यवरांच्या हस्ते टपाल तिकिटाचे अनावरण, गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती धनादेश वितरण कार्यक्रम, जन्मशताब्दी बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी सामाजिक न्याय राज्यमंत्री अविनाश महातेकर, अण्णाभाऊ साठे स्मारक समितीचे उपाध्यक्ष मधुकर कांबळे, आमदार दिलीप कांबळे, सुधाकर भालेराव, भाई गिरकर, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, मुंबई क्षेत्राच्या पोस्ट मास्तर जनरल स्वाती पांडे आदी उपस्थित होते.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्यावरील टपाल तिकिटाचे गुरुवारी अनावरण करताना (डावीकडून) सामाजिक न्याय राज्यमंत्री अविनाश महातेकर, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई क्षेत्राच्या पोस्ट मास्तर जनरल स्वाती पांडे, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील