मुंबई - राजधानी दिल्लीतील जंतरमंतरवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुकारलेल्या जनआंदोलनाने देश ढवळून निघाला होता. भ्रष्टाचाराचा नायनाट करण्यासाठी, लोकायुक्तांच्या नियुक्तीसाठी अण्णांनी केलेल्या उपोषणाची इतिहासात नोंद झाली. काँग्रेस सरकारच्या काळात अण्णांनी हे आंदोलन केले होते. त्यानंतर, भाजपा सरकारच्या काळात अण्णा गप्प का? असा सवाल अनेकदा सोशल मीडियातून विचारण्यात येतो. त्यावर, आता अण्णांनी उत्तर दिलंय. मी एकटाच काय करू, असेही अण्णा म्हणाले.
काँग्रेस सरकारच्या काळात भ्रष्टाचार बाहेर काढणारे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे भारतीय जनता पक्षाच्या मोदी सरकारच्या काळात इतके भ्रष्टाचार बाहेर निघाले तरी अण्णा हजारे गप्प का आहेत? असा खडा सवाल इंडिया अगेन्स्ट करपशनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी केला होता. शेतकऱ्यांचे आंदोलन गेल्या आठ महिन्यांपासून दिल्लीत सुरु असून, आजवर अण्णांनी त्याविरोधात एक शब्दही का काढला नाही? असेही त्यांनी विचारले होते. त्यानंतर, सोशल मीडियातून अण्णांना काहीजणांकडून ट्रोल करण्यात आलं. भाजपविरोधी गटातील कार्यकर्त्यांकडूनही अण्णांच्या चुप्पीवर प्रश्न विचारले जातात. आता, अण्णांनी स्पष्टच शब्दात उत्तर दिलंय. जनताच कुंभकर्णासारखी झोपलीय, मी एकटा काय करू? असा प्रतिप्रश्न अण्णांनी केला आहे.
अण्णांना उद्देशून काय म्हणाले हेमंत पाटील
हेमंत पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे अनेक मुद्यांवर मते मांडली. दिल्लीत शेतकऱ्यांच्या गंभीर प्रश्नाबाबत अनेक महिन्यांपासून आंदोलन चालू आहे. अण्णा हजारे यांनी 'शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाही, तर अंदोलन करु' असे सांगितले. पण भाजपाचे देवेंद्र फडणवीस आणि त्याचे सहकारी राळेगणसिद्धी येथे भेटुन गेले की अण्णा हजारेंनी भूमिका बदलली. सध्या त्यांना भ्रष्टाचाराविरुद्ध काम करायचे नाही वाटते. भाजपाच्या काळात होणारा अफाट भ्रष्टाचारविरोधात आम्ही मैदानात उतरु. मराठा, ओबीसी, धनगर आरक्षण प्रश्नाबाबत आमचा लढा सुरु राहील.'