मुंबई : जून महिना संपून जुलै सुरू झाला. पावसानेदेखील चांगलाच जोर पकडला आहे. तरीही मुंबई महानगरपालिकेचे खड्ड्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. गेले तीन दिवस पडलेल्या पावसाने मुंबईतल्या अनेक रस्त्यांची चाळण झाली आहे. याचा फटका चेंबूरच्या आण्णाभाऊ साठे उड्डाणपुलाला बसला आहे. चेंबूर पूर्व येथील सायन-पनवेल महामार्गावरील अण्णाभाऊ साठे उड्डाणपुलावर मोठे खड्डे पडले आहेत. उड्डाणपुलाच्या सुरुवातीला तसेच वळणावर मोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना मोठा अडथळा निर्माण होत आहे.
गेल्या वर्षीच्या पावसाळ्यातही या पुलावर मोठे खड्डे पडले होते. यानंतर या पुलाची डागडुजीदेखील करण्यात आली होती, मात्र वर्षही उलटत नाही तोपर्यंत या पुलावर पुन्हा खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे महानगरपालिकेच्या काम करण्याच्या पद्धतीवर शंका उपस्थित होत आहे. सायन-पनवेल महामार्गावरून दररोज लाखो वाहने ये-जा करीत असतात. सायन येथून चेंबूरमध्ये प्रवेश करताना याच पुलावरून जावे लागते. या उड्डाणपुलावर प्रवेश करताना गाड्यांचा वेग जास्त असतो. मात्र मध्येच समोर खड्डे आल्यामुळे अचानक ब्रेक दाबावा लागतो. बऱ्याचदा वाहने मागून एकमेकांवर आदळतात.
वाहनांचे नुकसान होते. दुचाकीस्वारांना खड्ड्यांमुळे मणक्याचे आजार होत आहेत. खड्ड्यांमधील माती व खडी बाहेर आल्यामुळे दुचाकीस्वार घसरून पडण्याचे प्रमाणदेखील वाढले आहे. महानगरपालिकेने लवकरात लवकर या खड्ड्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे. महानगरपालिकेने वेळीच हे खड्डे बुजविले नाही तर येथे मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गेल्या वर्षी या पुलावरील खड्ड्यांसंदर्भात महानगरपालिकेत आणि स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये अनेक तक्रारी केल्या. तरीही खड्डे बुजविले नाहीत म्हणून त्याच खड्ड्यांमध्ये बसून आंदोलन केले. त्यानंतर खड्डे बुजविलेदेखील. मात्र या वर्षी परत खड्डे पडले आहेत. महापालिकेने लवकरात लवकर हे खड्डे बुजवावेत; अन्यथा पुन्हा या पुलावर आंदोलन करण्यात येईल.- दिनेश शिंदे, वॉर्ड अध्यक्ष १५५ आरपीआयगेल्या वर्षी या पुलावरील खड्ड्यांसंदर्भात महानगरपालिकेत आणि स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये अनेक तक्रारी केल्या. तरीही खड्डे बुजविले नाहीत म्हणून त्याच खड्ड्यांमध्ये बसून आंदोलन केले. त्यानंतर खड्डे बुजविलेदेखील. मात्र या वर्षी परत खड्डे पडले आहेत. महापालिकेने लवकरात लवकर हे खड्डे बुजवावेत; अन्यथा पुन्हा या पुलावर आंदोलन करण्यात येईल.- दिनेश शिंदे, वॉर्ड अध्यक्ष १५५ आरपीआय