अण्णाभाऊ साठे यांच्या कुटुंबीयांची उपेक्षाच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 02:54 AM2017-08-19T02:54:31+5:302017-08-19T02:54:36+5:30
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना ‘भारतरत्न’ पुरस्काराने गौरवावे आणि लहुजी साळवे आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी
मुंबई : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना ‘भारतरत्न’ पुरस्काराने गौरवावे आणि लहुजी साळवे आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी अण्णाभाऊंचे कुटुंबीय गेल्या तीन दिवसांपासून आझाद मैदानात उपोषणास बसले होते. मात्र, सामाजिक न्यायमंत्र्यांनी या उपोषणाकडे पाठ फिरविल्याने साठे कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केली आहे.
अण्णाभाऊंचे नातू सचिन साठे यांनी सांगितले की, गेल्या तीन दिवसांपासून सामाजिक न्यायविभागाच्या सचिवांची भेट होईल, असे प्रशासनाकडून कळविण्यात आले. मात्र, हा धोरणात्मक निर्णय असल्याने सामाजिक न्यायमंत्री किंवा मुख्यमंत्र्यांची भेट मिळावी, अशी आमची मागणी होती. सामाजिक न्यायमंत्र्यांनी वारंवार भेटीचे आश्वासन दिले. मात्र, प्रत्यक्षात वेळ दिली नाही. खुद्द साठे कुटुंबीयांना समाजाच्या मागण्यांसाठी सामाजिक न्यायमंत्र्यांची भेट मिळत नसेल, तर सर्वसामान्य बहुजन समाजाचे काय? असा सवाल साठे यांनी उपस्थित केला आहे.
अण्णाभाऊ साठे यांची सून, बहीण, नात, नातजावई आणि इतर कुटुंबीयांनी बुधवारपासून तीन दिवस आझाद मैदानात साखळी उपोषण केले. लहुजी साळवे आयोगाने केलेल्या ८२ शिफारशींपैकी शासनाने ६८ शिफारसी मान्य केल्या आहेत. त्याचीच अंमलबजावणी करावी, अशी कुटुंबीयांची मागणी असल्याचे सून सावित्रीबाई साठे यांनी सांगितले. मात्र, सरकार दरबारी निराशा झाली असली, तरी विविध संघटनांनी आंदोलनाला पाठिंबा दिल्याने बळ मिळाले आहे. सरकारला आगामी दोन महिन्यांचा पर्याय दिला आहे. या दोन महिन्यांत मागण्या पूर्ण केल्या नाहीत, तर सरकारविरोधात बेमुदत उपोषणास बसणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.
प्रमुख मागण्या
लहुजी साळवे आयोगाने केलेल्या शिफारशींची अंमलबजावणी करा.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरोणत्तर ‘भारतरत्न’ पुरस्काराने गौरवा.
घाटकोपरच्या चिरागनगर येथील अण्णाभाऊंच्या राहत्या घराच्या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक उभारा.