नवी मुंबई : महिला सक्षमीकरणासाठी अन्नपूर्णा महिला मंडळाने केलेल्या कामाची दखल महानगरपालिकेने घेतली आहे. शहरातील महिलांच्या विकासासाठी काम करणाऱ्या इतर संस्थांनाही प्रेरणा मिळावी यासाठी अन्नपूर्णा मंडळास सावित्रीबाई फुले पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमीत्त विष्णूदास भावे नाट्यगृहात आयोजीत केलेल्या कार्यक्रमामध्ये महापौर सागर नाईक यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. बचत गट, पाळणा घर, वसतीगृह, मायक्रो फायनान्स, शिष्यवृत्ती या उपकमांच्या माध्यमातून अन्नपुर्णाने हजारो महिलांना आर्र्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविले आहे. त्यांच्या या कामापासून बचत गट चालविणाऱ्या व इतर महिला मंडळास प्रेरणा मिळावी, महिला सक्षमीकरणाच्या चळवळीस गती प्राप्त व्हावी यासाठी संस्थेला पुरस्कार देण्यात आला आहे. संस्थेच्या पदाधिकारी रेखाताई दाभाडे व इतर महिलांनी या पुरस्काराचा स्विकार केला. यावेळी आयोजीत कार्यक्रमामध्ये वर्ध्यावरून आलेल्या डॉ. पुष्पा तायडे यांनी व्याख्यानातून सावित्रीबार्इंचा जीवनपट उलगडून दाखविला. महापालिकेच्यावतीने विधवा व निराधार महिलांच्या मुलींच्या विवाहासाठी २२ लाभार्थींना प्रत्येकी ३५ हजार रूपयांचे अर्थसहाय्य केले. याशिवाय पालिकेने आयोजीत केलेल्या रांगाळी, समुहनृत्य व इतर स्पर्धांमधील विजेत्यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास महिला व बालकल्याण समितीच्या सभापती स्वाती गुरखे,मोनीका पाटील, शैला नाथ, स्रेहा पालकर आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. अन्नपूर्णा महिला मंडळाचे उपक्रमजेष्ठ सामाजीक कार्यकर्त्या प्रेमाताई पुरव यांनी अन्नपूर्णा महिला मंडळाची स्थापना केली. सद्यस्थितीमध्ये त्यांच्यासोबत डॉ. मेधा सामंत- पुरव व इतर सहकाऱ्यांनी संस्थेचा व्याप राज्यभर वाढविला आहे. नवी मुंबईत संस्थेच्यावतीने वस्तीगृह चालविले जात आहे. कळवा ते तुर्भे पर्यंतच्या झोपडपट्टी परिसरात बचत गट चालविले जात आहेत. मायक्रो फायनान्सच्या माध्यमातून महिलांना कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. कष्टकरी महिलांच्या मुलांसाठी पाळणाघर सुरू केले आहे. विधवा महिलांच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती सुरू केली असून १८०० मुले याचा लाभ घेत आहेत.
अन्नपूर्णा महिला मंडळास फुले पुरस्कार
By admin | Published: January 03, 2015 10:21 PM