Join us

ऐन दिवाळीत भाजपाची सेनेमागे फरफट

By admin | Published: October 25, 2016 4:38 AM

मुंबईकरांच्या मनात शिवसेनेची खास ओळख आहे. काही कार्यक्रम म्हणजे तर शिवसेनेनेचे वर्षानुवर्षांपासून ब्रँड बनलेले आहेत. त्यात प्रकर्षाने येणारे म्हणजे ‘दिवाळी पहाट’चे कार्यक्रम.

मुंबई : मुंबईकरांच्या मनात शिवसेनेची खास ओळख आहे. काही कार्यक्रम म्हणजे तर शिवसेनेनेचे वर्षानुवर्षांपासून ब्रँड बनलेले आहेत. त्यात प्रकर्षाने येणारे म्हणजे ‘दिवाळी पहाट’चे कार्यक्रम. दिवाळी पहाट हा उपक्रम शिवसेनेच्या माध्यमातून मुंबईत रुजला. आता आगामी निवडणुकांच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमांच्या मेजवानीच्या नावाखाली भाजपाने दिवाळी पहाटच्या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. एकूणच दिवाळी पहाटच्या निमित्तानेही भाजपाची शिवसेनेमागे फरफट होणार असेच दिसून येत आहे. यापूर्वीही भाजपाकडून अशी कॉपी करण्याचे प्रकार झालेले आहेत. शिवसेनेच्या शिवबंधनची कॉपी करत भाजपाने अटलबंधन आणले. पण ते फार यशस्वी होऊ शकले नाही. दहीहंडीमध्येही शिवसेनेचे वर्चस्व मुंबईसह ठाण्यात होते. ते मोडून काढण्यासाठी भाजपाने चांगलीच कंबर कसली होती. मोठमोठ्या बक्षिसांचे आमिष दाखवून टी-शर्ट वाटण्यावर भाजपाने मोठा भर दिला होता. तरीही त्यातून भाजपाच्या हाती काही लागले नाही. गणपती मंडळांना आकर्षित करून घेण्यासाठीही भाजपाने आटोकाट प्रयत्न केले. गणेशोत्सवात विशिष्ट डिझाईन्सचे स्वागत गेट मुंबईभर लागले होते. त्यातून ‘हे’ कोणी केले हेदेखील तेव्हाच स्पष्ट झाले होते. विशेष म्हणजे शिर्डीला पायी जाणाऱ्या मंडळांना बोलावून त्यांना आर्थिक मदत देण्याची तयारी भाजपाने केली होती. ज्या साईभक्तांना मीटिंगला बोलवण्यात आले, त्यात ८० टक्क्यांहून अधिक शिवसैनिक होते. त्यामुळे आमिषाला कोणी दाद न दिल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. आता भाजपाने दिवाळी पहाट कार्यक्रमांचे आयोजन मराठी मतदारबहुल भागांमध्ये केले आहे. त्यामुळे दिवाळीच्या गुलाबी थंडीत राजकारणाची ऊब मुंबईकरांना चांगलीच जाणवणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे. (प्रतिनिधी)‘पक्षश्रेष्ठींना खूश करण्याचा प्रयत्न’दिवाळी पहाट हा सांस्कृतिक वारसा जपणे शिवसेनेने सुरू केले. त्याची जाहिरात, प्रसिद्धी करावीशी आम्हाला कधी वाटली नाही. मराठी जनांना हे चांगले ठाऊक आहे. पक्षश्रेष्ठींना खूश करण्यासाठी कोणी असले प्रयत्न करत असेल, तर आम्हाला त्याविषयी काहीही म्हणायचे नाही. - हर्षल प्रधान, जनसंपर्क प्रमुख, शिवसेना ‘स्पर्धा कदापि नाही’ : यापूर्वीही भाजपाने त्या-त्या स्तरावर सांस्कृतिक कार्यक्रम, सण, उत्सव साजरे केलेले आहेत. यंदा हे आयोजन मोठ्या प्रमाणावर केले जात आहे. प्रत्येक पक्षाला आपल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचण्याचा, पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. भाजपाच्या उत्सवांमागे अन्य कोणत्याही पक्षाशी स्पर्धा करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. - केशव उपाध्ये, प्रवक्ते, भाजपाभाजपाची येथे दिवाळी पहाट २८ आॅक्टोबर - दहिसर पूर्व२९ आॅक्टोबर - मुलुंड पूर्व३० आॅक्टोबर - गोरेगाव पूर्व३१ आॅक्टोबर - दादर पश्चिम१ नोव्हेंबर - गिरगावशिवसेनेतर्फे ‘दिवाळी पहाट’मुंबईतील दादर, नायगाव, विलेपार्ले, अंधेरी, गिरगाव, दहिसर, गोरेगाव या भागांत वर्षानुवर्षे शिवसेनेचे दिवाळी पहाट कार्यक्रम होतात.