‘मिडब्रेन अॅक्टिव्हेशन’विरोधात ‘अंनिस’ने पुकारला एल्गार
By admin | Published: September 22, 2015 02:11 AM2015-09-22T02:11:27+5:302015-09-22T02:11:27+5:30
माणसामधील सहावे इंद्रिय जागृत करण्याचा दावा करीत काही व्यक्ती आणि संस्था देशभर मिडब्रेन अॅक्टिव्हेशनच्या नावाखाली लहान मुलांच्या पालकांची आर्थिक फसवणूक करीत असल्याचा
मुंबई : माणसामधील सहावे इंद्रिय जागृत करण्याचा दावा करीत काही व्यक्ती आणि संस्था देशभर मिडब्रेन अॅक्टिव्हेशनच्या नावाखाली लहान मुलांच्या पालकांची आर्थिक फसवणूक करीत असल्याचा आरोप महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केला आहे. सोमवारी पत्रकार परिषद घेत अंनिसने या प्रकाराचे पितळ उघडे पाडणार असल्याचे सांगितले. शिवाय ज्या पालकांची या प्रकारात फसवणूक झाली असेल, त्यांनी पुढे येऊन तक्रार करण्याचे आवाहन केले आहे.
२१ सप्टेंबर १९९५ रोजी राज्यासह देशभर गणपतीची मूर्ती दूध पीत असल्याची घटना घडवून आणण्यात आली होती. त्यानंतर अंनिसने त्यामागचे वैज्ञानिक कारण पटवून देत ही अंधश्रद्धा असल्याचे सिद्ध केले होते. त्यानंतर २१ सप्टेंबर हा दिवस चमत्कार सत्यशोधन दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने सध्या देशात फोफावणाऱ्या मिडब्रेन अॅक्टिव्हेशन या फसव्या विज्ञान प्रकाराचे पितळ उघडे पाडण्याचा निर्णय घेतल्याचे अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी सांगितले.
स्पर्धेच्या युगात मुलाची बौद्धिक क्षमता वाढवण्याचे आमिष दाखवल्याने पालक अशा फसव्या जाहिरातींना भुलत असल्याचे पाटील यांनी सांगितले. देशपातळीवर काम करणाऱ्या फेडरेशन आॅफ रॅशनॅलिस्ट असोसिएशनचे (फिरा) अध्यक्ष प्रा. नरेंद्र नायक यांच्या मदतीने राज्यात मिडब्रेन अॅक्टिव्हेशनविरोधात अंनिस जनजागृती करणार आहे. फिराने केरळ, गोवा आणि पाँडिचेरी राज्यांतून हा प्रकार हद्दपार केल्याचेही पाटील यांनी सांगितले.