अंनिसने राजनैतिक अंधश्रद्धा दूर करणे आवश्यक - तुषार गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 03:58 AM2019-08-12T03:58:04+5:302019-08-12T03:58:33+5:30
विचारांची लढाई विचारांनी लढता येत नाही म्हणून त्यांना शस्त्रांनी संपवण्यात येते. अशा अस्वस्थ वातावरणात आपण जगत आहोत.
मुंबई : विचारांची लढाई विचारांनी लढता येत नाही म्हणून त्यांना शस्त्रांनी संपवण्यात येते. अशा अस्वस्थ वातावरणात आपण जगत आहोत. अशा वातावरणात अंनिस सारख्या संस्थांनी राजनैतिक अंधश्रद्धा दूर करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन तुषार गांधी यांनी केले. समतावादी संघटना विखरून गेल्या आहेत. त्यामुळे राजकीय सुधारणा होण्यासाठी अंनिसने कृतीशील होण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
अंनिसच्या त्रिदशकपूर्तिनिमित्त आयोजित राज्यस्तरीय अधिवेशनाच्या समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून तुषार गांधी उपस्थित होते. अंधश्रद्धांचे खंडन करणे सोपे आहे. कारण त्यांचे वैज्ञानिक दाखले देता येतात. वैचारिक अंधश्रद्धांसोबत लढणे कठीण आहे. आज ज्याप्रमाणे संविधानाला अपंग करण्यात येत आहे, ते पाहता अंनिसची जबाबदारी वाढणार आहे. येणारी तीस वर्षे आणखी कसोटी पाहणारी असणार आहेत. काश्मीर प्रश्नी घेतलेला निर्णय हा संविधांनावर मारलेला पहिला हातोडा असल्याचे त्यांनी नमूद केले.
संघटनेत भावनिक ओलावा असेल तरच संघटन वाढते. संघटनेतील कार्यकर्त्यांनी फक्त कामासाठी एकमेकांना फोन न करता कामाव्यतिरिक्त देखील फोन करावा. यानेच संघटनेतील कार्यकर्त्यांची नाळ जुळून राहते, असे प्रतिपादन प्रमुख वक्ते विनायक सावळे यांनी केले. महाराष्ट्र अंनिसचा भविष्यवेध या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते. विद्यार्थीदशेपासूनच मी चळवळीत सक्रिय होतो. डॉ. दाभोलकर सांगायचे की, आपण चालत असताना दोन्ही बाजूने लक्ष द्यावे लागते व समोर देखील पहावे लागते. संघटना चालवताना देखील आपल्याला सगळीकडे लक्ष देऊन भविष्यात पहावे लागते. प्रशिक्षित कार्यकर्त्यांची फळी निर्माण होणे गरजेचे आहे.
अंनिसने टिष्ट्वटर, फेसबुक या समाजमाध्यमांवर सक्रिय होण्याची गरज आहे. संघटनेने समकालीन प्रश्न हाताळणे गरजेचे आहे. संघटना वाढीला बळ मिळेल. शिक्षक हे अंनिससाठी नेहमीच आधार राहिले आहेत. यापुढे अंनिसने शालेय विद्यार्थ्यांमध्ये जाऊन काम करणे गरजेचे असल्याचे मत अंनिसचे कार्यकर्ते कृष्णा साथी यांनी व्यक्त केले. अंनिसच्या कार्यकर्त्या आरती नाईक म्हणल्या की, भारतात पन्नास टक्के स्त्रिया अंधश्रद्धेच्या बळी ठरत आहेत. जो पर्यंत समाजाला लिंगसमभाव समजणार नाही, तो पर्यंत महिलांचे प्रश्न सुटणार नाही.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रदीप पाटकर म्हणाले, संघटनेने रोजच्या जीवनातील व्यवहारी प्रश्न हाताळणे गरजेचे आहे. संविधान लोक वाचत नसल्यामुळे त्यांना ते कळत नाही. त्यांना ते समजावून सांगणे गरजेचे आहे. रिअॅक्टीव होण्यापेक्षा प्रोअॅक्टीव व्हा. लडाख येथील शास्त्रज्ञ सोनम वांगचूक यांनी उपस्थितांना व्हिडिओद्वारे संदेश दिला. भारतात काश्मीर ते कन्याकुमारी सर्वत्र अंधश्रद्धा पसरली आहे. गरीब व श्रीमंत अशा सर्वांमध्ये अंधश्रद्धा पसरली आहे. आणि अंनिसच काम हे कौतुकास्पद आहे.