बेस्टच्या वर्धापन दिनावर कर्मचारी संपाचे सावट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2019 01:26 AM2019-08-06T01:26:02+5:302019-08-06T06:46:29+5:30

संघटनांबरोबर वाटाघाटी सुरू; ६ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून संपाचा इशारा

On the anniversary of the Best, the staff strikes | बेस्टच्या वर्धापन दिनावर कर्मचारी संपाचे सावट

बेस्टच्या वर्धापन दिनावर कर्मचारी संपाचे सावट

googlenewsNext

मुंबई : बेस्ट उपक्रम वर्धापन साजरा करीत असताना, कामगार संघटनांनी संपाचे हत्यार उपसले आहे. कामगार संघटनांबरोबर वाटाघाटी सुरू असल्याने संप करू नये, असे आवाहन बेस्ट प्रशासनाने केले आहे. मात्र, कामगार संघटना आपल्या निर्णयावर ठाम असल्याने, या प्रश्नावर मंगळवारी पुन्हा बैठक बोलाविण्यात आली आहे. त्यानंतरच कामगारांच्या संपाबाबत आपली भूमिका मान्यताप्राप्त संघटना बेस्ट वर्कर्स युनियन स्पष्ट करणार आहे. त्यामुळे ७ ऑगस्ट रोजी साजरा होणाऱ्या ७३व्या बेस्ट दिनावर या वर्षी संपाचे सावट आहे.

सुधारित वेतनश्रेणी, कामगार वसाहतींची दुरुस्ती आदी मागण्यांबाबत बेस्ट कामगार संघटनांनी जानेवारी महिन्यात संप पुकारला होता. हा संप नऊ दिवस चालल्यानंतर उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या मध्यस्थीच्या माध्यमातून बेस्ट प्रशासन आणि कामगार संघटनांमध्ये वाटाघाटी सुरू झाली. सामंजस्य करार झाल्यानंतर बेस्ट प्रशासनाने चर्चेसाठी बोलावलेच नाही, असा आरोप करीत बेस्ट वर्कर्स युनियनने ६ ऑगस्ट मध्यरात्रीपासून पुन्हा संप पुकारण्याचा इशारा दिला आहे. मात्र, करार जून महिन्यात झाल्यानंतर वाटाघाटी व चर्चा सुरू करण्यास थोडा अवधी लागतो. कामगार संघटनांनी थोडा धीर धरणे अपेक्षित आहे, असे मत बेस्ट समिती अध्यक्ष अनिल पाटणकर यांनी सोमवारी व्यक्त केले.

कामगार संघटनांनी थोडे सबुरीने घ्यावे!
सामंजस्य कराराप्रमाणे ज्युनिअर ग्रेडच्या कर्मचाऱ्यांना २० टक्के वेतनवाढ देण्यात आली आहेत. लवकरच निवृत्त कर्मचाºयांच्या ग्रॅच्युइटी देण्यात येतील. सुधारित वेतन श्रेणीबाबत कामगार संघटनांबरोबर एक बैठक झाली आहे, तर दुसरी बैठक मंगळवारी बेस्ट भवन येथे बोलाविण्यात आली आहे. त्यामुळे संप करून जनतेला वेठीस न धरता कामगार संघटनांनी थोडे सबुरीने घ्यावे, असे आवाहन बेस्ट समिती अध्यक्ष अनिल पाटणकर आणि महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे यांनी बेस्ट दिनानिमित्त बेस्ट भवनात आयोजित पत्रकार परिषदेत केले. मात्र, आंदोलनाची पुढील दिशा मंगळवारी संध्याकाळी परळ येथील शिरोडकर हायस्कूलमध्ये निश्चित करण्यात येईल, असे बेस्ट वर्कर्स युनियनचे नेते शशांक राव यांनी सांगितले.

वाटाघाटी सुरू आहेत, उद्या पुन्हा बैठक बोलावली आहे. कर्मचाºयांची नवीन वेतनश्रेणी निश्चित करणे व इतर मागण्यांवर चर्चा करण्यास बेस्ट प्रशासन तयार आहे. कामगार संघटनांनी संपाची घाई करू नये.
- अनिल पाटणकर, अध्यक्ष, बेस्ट समिती

संपावर आम्ही ठाम आहोत. उद्याच्या बैठकीनंतर परळ येथील शिरोडकर हायस्कूलमध्ये आयोजित कामगार मेळाव्यात संपाबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल.
- शशांक राव, नेते, बेस्ट वर्कर्स युनियन

Web Title: On the anniversary of the Best, the staff strikes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.