मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करा; उद्धव ठाकरे यांचे काँग्रेस, शरद पवार गटाला आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2024 06:23 AM2024-10-09T06:23:57+5:302024-10-09T06:24:22+5:30
महाराष्ट्र धर्म राखण्यासाठी जो सोबत येईल तो माझा आहे. महाराष्ट्र वाचविण्यासाठी जे काही करायचे असेल ते मी करेन, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: काँग्रेस आणि शरद पवार गटाने मुख्यमंत्रिपदासाठी आपला उमेदवार जाहीर करावा. त्याला माझा पाठिंबा आहे. महाराष्ट्र वाचविण्यासाठी जे काही करायचे असेल ते मी करेन, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. शिवाजी मंदिर येथे मंगळवारी राज्यव्यापी वज्र निर्धार परिषद पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.
ठाकरे म्हणाले की, तुम्ही कोणी नव्हता तेव्हा आम्ही तुम्हाला खांदा दिला, मोठे केले हे आमचेच पाप आहे. खांद्याचे दोन अर्थ होतात. आताही वाटते तुम्हाला खांदा द्यावा. जनता त्याचीच वाट बघत आहे. लोकशाही संपविण्याची भाषा करता, तशी पावले टाकत आहात. ही पावले लोकांनी ओळखली त्यामुळेच लोकसभेत तुम्हाला नाकारले.
मराठी भगिनी, बांधवांनो आणि मातांनो! अशी सुरुवात शिवसेनाप्रमुख करायचे. त्यानंतर त्यांनी हिंदू बंधू भगिनी म्हटले. मी ही निवडणूक काळात देशभक्त म्हटले. देशावर घाला घातला जात असताना देशभक्त शब्द वापरला. माझे काय चुकले? महाराष्ट्र धर्म राखण्यासाठी, वाचविण्यासाठी जो, जो सोबत येईल तो माझा आहे, असेही ठाकरे म्हणाले.
‘बुलेट नाही तर आता बॅलेट ही क्रांती घडविणार’
शिवसेना आणि महाविकास आघाडीकडून ज्या अपेक्षा आहेत त्यात वेगळे काय आहे? तुमची आमच्याकडून अपेक्षा आहे. पण ती पूर्ण कधी होणार? ज्यावेळी आम्हाला सत्ता मिळेल तेव्हा? मत मागणारे आणि मत बनविणारे त्यात फरक असतो. तुम्ही मत बनविणारे आहात. आमचा जाहीरनामा नाही तर वचननामा असतो. सत्तेत बसलेल्यांविरोधात नव्या क्रांतीची सुरुवात केली आहे. बुलेट नाही तर बॅलेट ही क्रांती घडविणार आहे. रणांगणात उतरलो आहोत तुमची साथ सोबत द्या, असे आवाहनही ठाकरे यांनी केले.