पुणे/मुंबई : एमपीएससीमार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षा अनेक महिन्यांपासून रखडल्या आहेत. राज्यसेवा पूर्व परीक्षा, संयुक्त पूर्व परीक्षा गट ब आणि क परीक्षेच्या तारखा जाहीर कराव्यात, यासह लिपिक टंकलेखक ७ हजार पदांवर तसेच इतर परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना तत्काळ नियुक्त्या द्याव्यात, अशी मागणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्यांसंदर्भात पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविले आहे.
एमपीएससीमार्फत विविध पदांसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षा आणि त्यानंतर नियुक्त्या वेळेवर मिळाव्यात ही अहाेरात्र अभ्यास करणाऱ्या लाखाे विद्यार्थ्यांची अपेक्षा असते. मात्र, सद्यस्थितीत विविध पदांसाठी परीक्षांच्या जाहिराती तसेच तारखा जाहीर करण्यास विलंब हाेत आहे, तसेच उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नियुक्त्या मिळत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये मोठा असंतोष आहे. विद्यार्थ्यांच्या आंदाेलनानंतर ऑगस्टमधील राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली, मात्र त्यास तीन आठवडे झाले असून ही परीक्षा केव्हा घेणार? आणि जाहिरातीमध्ये कृषी विभागातील रिक्त २५८ जागांचा समावेश करणार का? याबाबत स्पष्टता नाही. संयुक्त पूर्व परीक्षा गट ‘ब’ आणि ‘क’चे आयाेजन केलेले नाही. ऑक्टोबरमध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने यासंदर्भात त्वरित निर्णय घ्यावा, असे पवार यांनी पत्रात नमूद केले आहे.
चर्चेसाठी मागितला वेळ
nस्पर्धा परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या मागण्या रास्त असून, चर्चा करण्यासाठी आपली वेळ मिळावी, यासाठी मी गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न करत आहे.
nविद्यार्थ्यांच्या मागण्यांसंदर्भात बैठक आयोजित करण्यासाठी व्यग्र कार्यक्रमांतून वेळ द्यावा, अशी अपेक्षाही पवार यांनी व्यक्त केली.