Join us  

‘साहेब’ आणि त्यांच्या ‘मेहुण्या’चे नाव जाहीर करा - निरुपम

By admin | Published: May 11, 2016 3:40 AM

मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारास वांद्र्यातील साहेब, त्यांचा मेहुणा आणि एक खासगी सचिव जबाबदार असल्याचा आरोप भाजपा खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे

मुंबई : मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारास वांद्र्यातील साहेब, त्यांचा मेहुणा आणि एक खासगी सचिव जबाबदार असल्याचा आरोप भाजपा खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. सत्ताधारी पक्षाच्या सोमय्या यांनीच पालिका भ्रष्टाचाराची कबुली दिलेली आहे. आता त्यांनी वांद्र्यातील साहेबाचे नावसुद्धा जाहीर करावे, असे आव्हान मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी दिले आहे. मुंबई महानगरपालिकेत हजारो कोटींचा घोटाळा आहे. रस्ते घोटाळा, कचरा व्यवस्थापन घोटाळा, नाले सफाई घोटाळा, टॅब वाटप घोटाळा आणि डम्पिंग ग्राउंड घोटाळा अशी विविध प्रकरणे समोर आली आहेत. महापालिकेतील भ्रष्टाचाराला वांद्र्यातील साहेब त्यांचा मेहुणा आणि सचिव जबाबदार असल्याची कबुली भाजपाचे खासदार देत आहेत. भाजपादेखील महापालिकेच्या सत्तेत सहभागी आहे. त्यामुळे हे लोक कोण व त्यांची नावे सोमय्या यांनी जाहीर करावीत. मुंबईकरांना भ्रष्टाचाराबद्दल सर्व माहिती द्यावी, अशी मागणी निरुपम यांनी केली. महापालिकेतील भ्रष्टाचाराबद्दल इतकी माहिती असताना, भाजपा इतके दिवस गप्प का राहिली, प्रत्येक विभागात भ्रष्टाचार होत असताना भाजपा काय करत होती, असा सवाल करत या भ्रष्टाचाराबाबत भाजपाने आपली भूमिका स्पष्ट करावी, असे निरुपम म्हणाले. मुंबई काँग्रेसतर्फे आमची अशी मागणी आहे की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करावी व भाजपा खासदार किरीट सोमय्या यांनी सगळ्यांची नावे जाहीर करावीत. दोषी व्यक्तींवर कारवाई करावी, मग तो कोणीही असो, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. त्यांच्यावर एफआयआर दाखल करून, सविस्तर पोलीस कारवाई झाली पाहिजे (प्रतिनिधी)