Join us

२५ हजार दुष्काळमुक्त गावांची नावे जाहीर करा, काँग्रेसचे पंतप्रधानांना आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 5:45 AM

राज्यातील १६ हजार गावे दुष्काळमुक्त झाली आहेत व ९ हजार गावे दुष्काळमुक्त होण्याच्या मार्गावर आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिर्डी येथे जाहीर केले.

मुंबई : राज्यातील १६ हजार गावे दुष्काळमुक्त झाली आहेत व ९ हजार गावे दुष्काळमुक्त होण्याच्या मार्गावर आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिर्डी येथे जाहीर केले. पंतप्रधानांनी २५ हजार गावांची यादी जाहीर करावी, अशी मागणी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.राज्यात जवळपास २०१ तालुक्यांतील किमान २० हजार गावांमध्ये दुष्काळाची परिस्थिती आहे. त्यामुळे पंतप्रधान सवयीप्रमाणे खोटे बोलत असल्याचे सावंत म्हणाले. राज्य शासनातर्फे जलयुक्त शिवार योजनेकरिता आजवर ७ हजार ४५९ कोटी खर्च करण्यात आले. या अभियानांतर्गत ५ लाख ४१ हजार ९१ कामे पूर्ण झाली व २० हजार ४२० कामे प्रगतीपथावर आहेत, असे म्हटले गेले आहे. या अभियानामुळे टँकरच्या संख्येत ८० टक्के घट झाल्याची वल्गना सरकारतर्फे करण्यात आली, पण यंदा आॅक्टोबरमध्येच विविध भागांत शेकडो टँकर सुरू असल्याचे समोर आले आहे, असे सावंत म्हणाले.भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या सर्वेक्षणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. पाच वर्षांच्या तुलनेत राज्यातील एकूण ३५३ तालुक्यांपैकी २५२ तालुक्यांमधील १३ हजार ९८४ गावातील भूजल पातळीमध्ये एक मीटरपेक्षा जास्त घट आढळून आली आहे. त्यापैकी ३ हजार ३४२ गावांमध्ये ३ मीटरपेक्षा जास्त, ३ हजार ४३० गावांमध्ये २ ते ३ मीटर व ७ हजार २१२ गावांमध्ये १ ते २ मीटरने भूजल पातळी घटली आहे. त्यामुळे जलयुक्त शिवारच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या मातीत पाणी नव्हे, तर भ्रष्टाचार मुरला आहे, हे सूर्य प्रकाशाइतके स्पष्ट असल्याचे ते म्हणाले.