'दावोस दौऱ्यावर स्वतः खर्च करून निघालेल्या व्यक्तींची नावे जाहीर करा'; आदित्य ठाकरेंचं आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2024 12:21 PM2024-01-16T12:21:59+5:302024-01-16T12:22:22+5:30

माझ्या कालच्या पत्रकार परिषदेनंतर मुख्यमंत्री कार्यालयाने घाईघाईने दावोस दौऱ्याची किरकोळ माहिती आणि तेथे होऊ घातलेल्या काही करारांची माहिती, उघड केली, असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.

'Announce Names of Self-Expense Travel to Davos'; Aditya Thackeray's challenge to maharashtra goverment | 'दावोस दौऱ्यावर स्वतः खर्च करून निघालेल्या व्यक्तींची नावे जाहीर करा'; आदित्य ठाकरेंचं आव्हान

'दावोस दौऱ्यावर स्वतः खर्च करून निघालेल्या व्यक्तींची नावे जाहीर करा'; आदित्य ठाकरेंचं आव्हान

मुंबई: स्वित्झर्लंड येथील दावोस शहरात १५ ते १९ जानेवारी दरम्यान होणाऱ्या जागतिक आर्थिक परिषदेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल रात्री रवाना झाले आहेत. एकनाथ शिंदे आणि मंत्रिमंडळाच्या या दावोस दौऱ्यावरुन विरोधक टीका करत आहेत. दावोस दौऱ्याला जाताना घटनाबाह्य मुख्यमंत्री जवळपास ७० लोकांना सोबत घेऊन जात आहेत. ज्यांचा दौऱ्याशी काडीमात्र संबंध नाही, असा आरोप माजी मंत्री आणि ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे. 

दावोसला किती लोकं जाणार आहेत?, मुख्यमंत्री तिथे कोणाला भेटणार आहेत, याची यादी जाहीर करावी, असं आव्हान देखील आदित्य ठाकरेंनी दिलं आहे. आदित्य ठाकरेंच्या या आरोपवर मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिलं आहे. दावोस दौऱ्याचा सगळा हिशोब जनतेला देणार असल्याचं मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. शिष्टमंडळ स्वत:च्या खर्चाने दावोसला गेलं आहे, असंही उदय सामंत म्हणाले. तसेच वेदांता फोक्सकॉन आम्ही कधी घालवला नव्हता, तो घालवल्याचा आरोप आमच्यावर केला जातोय, अशी टीका उदय सामंत यांनी केली. 

उदय सामंत यांच्या या उत्तरावर आदित्य ठाकरेंनी ट्विट करत निशाणा साधला आहे. दावोस दौऱ्यावर स्वतः खर्च करून निघालेल्या व्यक्तींची नावे जाहीर करा आणि महाराष्ट्राच्या शिष्टमंडळात त्यांची भूमिका, जबाबदारी काय असेल; तेही स्पष्ट करा, असं आव्हान आदित्य ठाकरेंनी दिलं आहे. तसेच माझ्या कालच्या पत्रकार परिषदेनंतर मुख्यमंत्री कार्यालयाने घाईघाईने दावोस दौऱ्याची किरकोळ माहिती आणि तेथे होऊ घातलेल्या काही करारांची माहिती, उघड केली, असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे. एकीकडे उद्योगमंत्री करारांची माहिती उघड करायला पत्रकार परिषदेत नकार देत असताना, त्याच दरम्यान मुख्यमंत्री कार्यालयाने हे तपशील जाहीर केले, असंही आदित्य ठाकरेंनी ट्विटद्वारे म्हटलं आहे. 

दरम्यान, दावोस दौऱ्यावर रवाना होताना एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जागतिक आर्थिक परिषदेच्या माध्यमातून तीन लाख दहा हजार कोटींचे सामंजस्य करार करण्यात येणार आहेत. तसेच इतर देशांचे मंत्री तसेच मोठया कंपन्या आणि वित्तीय संस्थांशी चर्चा करून राज्यात जास्तीत जास्त गुंतवणूक आणण्याचा पूर्ण प्रयत्न करू असे यावेळी बोलताना स्पष्ट केले. दावोस दौऱ्याबाबत विरोधकांनी केलेली टीका ही संपूर्णपणे निरर्थक असून या दौऱ्यात कोणताही अनाठायी खर्च करण्यात आला नसून जो खर्च होईल त्यातील प्रत्येक रुपयाचा तपशील सर्वसामान्य लोकांपुढे आणला जाईल, असंही एकनाथ शिंदेंनी सांगितले. 

Web Title: 'Announce Names of Self-Expense Travel to Davos'; Aditya Thackeray's challenge to maharashtra goverment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.