मुंबई : नॅशनल कौन्सिल आॅफ व्होकेशनल ट्रेनिंग (एनसीव्हीटी) परीक्षेत झालेला गोंधळ अजूनही संपलेला नाही. आयटीआयच्या विद्यार्थ्यांसाठी देशपातळीवर घेतल्या जाणाºया एनसीव्हीटीत हजारो विद्यार्थ्यांना शून्य गुण मिळाला होता. त्यानंतर व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने ३० सप्टेंबरपर्यंत निकाल जाहीर करणार असल्याचे आश्वासन दिले होते. पण, अद्याप निकाल जाहीर झाले नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. म्हणून पुढच्या ४ दिवसांत सुधारित निकाल जाहीर करा, अशी विद्यार्थ्यांनी मागणी केली आहे.आयटीआयचे शिक्षण पूर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांना देशपातळीवरील एक परीक्षा द्यावी लागते. आता ज्या विद्यार्थ्यांचे निकाल अडकले आहेत त्यांची अॅप्रेन्टिसशिप ही २८ आॅगस्ट २०१६ रोजी संपली होती. पण, त्यानंतर सहा महिने एनसीव्हीटीची परीक्षा न झाल्याने विद्यार्थ्यांना थांबावे लागले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. पण, या परीक्षेचा निकाल लागण्यासही सहा महिन्यांचा विलंब झाला होता. त्यामुळे आधीच या विद्यार्थ्यांचे एक वर्ष वाया गेले आहे. तरी अजूनही संचालनालय विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याने विद्यार्थी त्रस्त झाले आहेत.संचालनालयाने २२ सप्टेंबर रोजी एनसीव्हीटी परीक्षेचा निकाल जाहीर केला. पण, या निकालानंतर मोठा गोंधळ झाला. अनेक विद्यार्थ्यांना एकाच ‘एम्प्लॉब्लिटी’ विषयात शून्य गुण देण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी याविरोधात आवाज उठवल्यावर निकालात सुधारणा करणार असल्याचे संचालनालयाकडून सांगण्यात आले. त्या वेळी प्रशासनाकडून ३० सप्टेंबरपर्यंत निकाल जाहीर करणार असल्याचे स्पष्ट केले होते.जोपर्यंत हा निकाल मिळत नाही, तोपर्यंत हे विद्यार्थी नोकरीसाठी जाऊ शकत नाहीत. गेल्या एका वर्षापासून विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.या प्रकरणाची तक्रार मनविसेच्या सुधाकर तांबोळी यांच्यासह विद्यार्थ्यांनी केली. ३० सप्टेंबरनंतर अजूनही निकाल जाहीर झाले नसल्याने मुंबईतील विद्यार्थ्यांनी पुन्हा दादर आयटीआयचे प्राचार्य आनंद लोहार यांची भेट घेतली. या वेळी विद्यार्थ्यांचा लवकरात लवकर निकाल जाहीर करण्याची मागणी केली. ही मागणी केल्यानंतर आॅनलाइन निकाल जाहीर केले असून, लवकरच गुणपत्रिका देण्याचे आश्वासन दिले आहे.
एनसीव्हीटीचा निकाल चार दिवसांत जाहीर करा , विद्यार्थ्यांचे नुकसान : व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाकडे मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 2:55 AM