मनोहर कुंभेजकर
मुंबई - कोरोना महामारीच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेनंतर शहरासह ग्रामीण भागांची अर्थव्यवस्था कोसळली आहे. रोजगार आस्थापना बंद असल्यामुळे गरीब लोकांची आर्थिक स्थिती अतिशय गंभीर झाली आहे. असा वेळी केंद्र सरकारच्या वतीने सर्व राज्य सरकारांना अध्यादेश जारी करून ज्यांनी लसीकरणाचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना विशेष सवलती जाहिर करा. त्यांना दुकान, व्यापार आस्थापना उघडण्याची सूट देण्यात यावी. या संदर्भात उत्तर मुंबईचे भाजपा खासदार गोपाळ शेट्टी यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांना एक विस्तृत पत्र लिहून सदर मागणी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या "सर्वांना मोफत लस" या मोहिेअंतर्गत उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेल्या नागरिकांना विशेष लाभ दिल्यामुळे इतर लसीकरण न घेणाऱ्या नागरीकांना ही लसीकरण करून घेण्यास प्रोत्साहन मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गोपाळ शेट्टी यांनी केंद्रीय मंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे की, ज्या नागरिकांनी लसींचे दोन डोस पूर्ण केले आहे त्यांना सकाळ संध्याकाळ उद्यान, मैदानात वॉकची परवानगी द्यावी, लोकल ट्रेनने प्रवास करण्याची तसेच व्यायामशाळा उघडण्याची विशेष परवानगी देण्यात यावी.
केंद्र सरकारने अशी एक विशेष तांत्रिक व्यवस्था ही तयार करावी जेणेकरून दोन डोस घेतलेले नागरिकांची ओळख सहज रित्या करता येईल आणि त्यांना हॉटेल, मॉलमध्ये ही प्रवेशांचे विशेष लाभ दिल्यामुळे अन्य विना लसीकरण फिरणाऱ्या शेकडो नागरिक लसीकरणासाठी पुढे येऊन देश सुरक्षेत सहभागी होतील.नदेशाची अर्थव्यवस्था ही मजबूत करण्याकरिता आपल्या सूचना लक्षात घेऊन सर्व राज्य सरकारांना तसे निर्देश द्यावे अशी विनंती गोपाळ शेट्टी यांनी पत्रात शेवटी नमूद केले आहे.