मुंबई : पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी महापालिकेकडून प्राथमिक स्तरावर प्रयत्न केले जात असून पीओपीच्या मूर्ती खरेदी करू नये, असे आवाहन महापालिका करीत आहे. त्यातच कारागिरांकडून अनेक कार्यशाळांमध्ये पीओपीच्या अनेक मूर्ती विक्रीसाठी ठेवण्यात आल्या असून पीओपीच्या किती मूर्ती बनवल्या, शाडूच्या, मातीच्या किती मूर्ती तयार केल्या त्याची आकडेवारी संबंधित विभाग कार्यालयांना सादर करण्यास पालिकेने मूर्तिकारांना बजावले आहे.पीओपीतील अविघटनशील घातक पदार्थांमुळे पर्यावरणाची प्रचंड प्रमाणात हानी होते. त्यामुळे पीओपीच्या मूर्ती नको असल्यास या मूर्तींचे केवळ कृत्रिम तलावातच विसर्जन करण्यात यावे, असे आवाहन पालिकेने मुंबईकरांना केले आहे. तसेच याची मुंबईकरांना माहिती मिळावी यासाठी गणेश कार्यशाळांबाहेर पालिकेने मोठे सूचना फलक लावले आहेत. घरगुती गणपतींच्या मूर्तीची उंची ४ फूट असावी. तसेच घरगुती गणपती मूर्ती शाडूच्या मातीची अथवा अन्य पर्यावरणपूरक साहित्याने तयार केलेली असावी, सर्व घरगुती गणपतींचे विसर्जन कृत्रिम तलावातच करण्यात यावे इतकेच नव्हे तर मूर्तिकार व साठवणूककर्त्यांनी २०२३ सालात किती मूर्ती शाडूच्या मातीने तसेच पीओपी व पर्यावरणपूरक साहित्याने तयार केल्या आहेत, त्याची माहिती प्रशासनाला देण्याचे त्या सूचना फलकात म्हटले आहे.
पीओपीच्या मूर्तींची आकडेवारी जाहीर करा! महापालिकेचे मूर्तिकारांना आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2023 3:49 PM