लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पोलीस उपनिरीक्षक पदाचा २०१८ मध्ये झालेल्या परीक्षेतील ओबीसीच्या खेळाडूच्या कोट्यातील उमेदवारांची प्रतीक्षा यादी नव्याने जाहीर करावी, असे आदेश महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरणाच्या (मॅट) चेअरमन मृदला भाटकर यांनी नुकतेच एका खटल्यात दिले आहेत. त्या यादीनुसार कार्यवाही करण्याची सूचना गृह विभागाला दिली आहे.
टेभुर्णी (जि. सोलापूर) येथील महेश अर्जुन कुटे या तरुणाने एमपीएससीच्या २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या उपनिरीक्षक पदाची परीक्षा दिली होती. ओबीसीच्या खेळाडू साठीच्या कोट्यातून प्रयत्न केले होते. त्याची मुलाखतही घेण्यात आली मात्र अंतिम निवड यादीत त्याचा समावेश करण्यात आला नाही. दरम्यान, याच परीक्षेच्या उपरोक्त कोट्यातून अनिल शेवाळेचीही निवड करण्यात आली होती. मात्र, त्याची २०१६ मध्ये झालेल्या परीक्षेत याच प्रवर्गातून निवड झाली होती. मात्र, तो काही कारणास्तव त्यावेळी प्रशिक्षणाला जाऊ शकला नव्हता. त्यामुळे तो २०१९ साली पोलीस खात्यात भरती होऊन उपनिरीक्षकाच्या प्रशिक्षणासाठी हजर झाला होता. त्यामुळे त्याने २०१८च्या परीक्षेच्या यादीत इच्छुक नसल्याचे आयोगाला कळविले होते. त्यानुसार आयोगाने त्याच्याऐवजी नव्याने एका जागेसाठी ५ याप्रमाणे प्रतीक्षा यादी जाहीर करणे आवश्यक होते. मात्र, ती करण्यात आली नाही. त्यामुळे कुटेच्या वतीने ॲड. डी. बी. खैरे यांनी ही अनियमितता मॅटच्या निदर्शनास आणली. त्यानुसार न्या. भटकर यांनी तीन आठवड्यांत नव्याने प्रतीक्षा यादी जाहीर करावी, गृह विभागाने त्यानुसार नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले.